
कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
पर्यावरण जपणे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे. येणार्या नव्या पिढीसमोर पर्यावरण जपण्याचे खूप आव्हान आहे. आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्लास्टिकचा वापर करतो. हेच प्लास्टिक पर्यावरणातील हवा, पाणी व जमीन प्रदूषित होण्यास कारणीभूत ठरते. प्लास्टिकला पर्याय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती उपयोगी ठरणार आहे. शासनस्तरावर उद्योजकांसाठी खूप सार्या योजना आहेत. तरुण उद्योजक विद्यार्थ्यांनी आपली नैतिक जबाबदारी ओळखून या संधीद्वारे आपल्या नाविन्यपूर्ण संशोधनाने या समस्येवर मात करावी. संशोधक विद्यार्थ्यांनी जैविक पद्धतीने विघटनशील प्लास्टिक बनवून पर्यावरण रक्षणासाठी मोठा हातभार लावू शकतात. त्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधनाची गरज असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कृषी तंत्रज्ञानचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील मृदशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून डॉ. प्रशांत बोडके मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी मृदशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भीमराव कांबळे, प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. नितीन दानवले,अखिल भारतीय समन्वित पाणी व्यवस्थापन योजनेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे, एकात्मिक शेती संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. राजेंद्र गेठे, डॉ. नरेंद्र काशीद व डॉ. सूर्यभान इल्ले उपस्थित होते.
यावेळी डॉ. अनिल दुरगुडे, मृदशास्त्रज्ञ यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने व्याख्यान दिले. आपल्या व्याख्यानात ते म्हणाले की वसुंधरेवर सर्व प्राणीमात्र तसेच प्रजातींना जगण्याचा अधिकार असून पंचमहाभूते या नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही मानवाची आहे. यामध्ये या नैसर्गिक संसाधनांना प्लास्टिकच्या अतिरिक्त वापरामुळे मनुष्य, जनावरे, पक्षी, जलचर प्राणी यांना धोका निर्माण झाला आहे. यासाठी आपण सर्वांनी प्लास्टिकचा वापर कमीत कमी करून कापड, कागद, धातू इत्यादी पर्यायी सामग्रीचा वापर करावा. त्याचबरोबर प्रत्येकाने एक झाड आईच्या नावाने या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करावे. विविध समारंभात भेटवस्तू म्हणून फुले, फळझाडांचे रोपे वाटावीत. माळरानावर, डोंगर उतारावर जास्तीत जास्त वृक्षारोपण व जैविक बांध घालून जमिनीतून होणारी धूप कमी करावी म्हणजे मौल्यवान माती वाहून जाणार नाही व भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यास मदत होईल असे त्यांनी यावेळी सांगितले. पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे व याची सुरुवात स्वतःपासून करावी असे आवाहन डॉ. भीमराव कांबळे यांनी यावेळी केले. डॉ. सूर्यभान इल्हे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. क्रांती पाटील यांनी हवामान बदलाचा शेतीवरील परिणाम या विषयावरील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र गेठे यांनी केले. या कार्यक्रमासाठी मृदशास्त्र व कृषीविद्या विभागातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
