गावोगावी असणाऱ्या बस थांब्यांची पुनर्बांधणी करा – युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव मतदारसंघात सध्या विविध गावांमध्ये अंतर्गत रस्त्यांचे शासकीय स्तरावर काम सुरू असून, या रस्त्यांच्या कामांच्या दरम्यान अनेक ठिकाणी शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या बस थांब्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. काही ठिकाणी हे बस थांबे हटवून टाकण्यात आले असून, काही ठिकाणी ते अर्धवट अवस्थेत उध्वस्त झालेले आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डॉ .पंकज आशिया यांच्याकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार, संबंधित ग्रामपंचायती आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी रस्ता पूर्ण झाल्यानंतर संबंधित गावांमध्ये आधीप्रमाणेच बस थांबे पुन्हा उभारणे व ज्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे ते करून घेणे बंधनकारक असावे, असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने त्वरित काढावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
विवेकभैय्या कोल्हे यांनी स्पष्ट केले की, बस थांबे हे फक्त वाहतूक व्यवस्थेचा भाग नसून नागरिक आणि विशेषतः विद्यार्थीवर्गासाठी निवारा देणारे ठिकाणही आहे. बस येईपर्यंत थांबण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध नसेल तर प्रवाशांना उन्हा-पावसात उभे राहावे लागते, जे आरोग्यास हानीकारक ठरते.

कोपरगाव मतदारसंघातील अनेक गावांमध्येहे चित्र दिसून येत असून, नागरिकांकडूनही याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तत्काळ या समस्येची गंभीर दखल घ्यावी व संबंधित यंत्रणांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी ठाम भूमिका कोल्हे यांनी मांडली.

“शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेले बस थांबे म्हणजे जनतेची संपत्ती असून,त्यांचे जतन करणे संबंधित यंत्रणेचे कर्तव्य आहे,” असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *