
तिफन सारख्या स्पर्धेच्या यशातूनच शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य होईल:- श्री. मुकुल वार्षनेय…
कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
भारतातील कृषी अभियंते हे जगामध्ये सर्वोच्च स्थानी असून इतर शाखेच्या अभियंत्यांपेक्षा ते सरस कामगिरी करीत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच रिमोट सेन्सर्स या तंत्रज्ञानाचा उपयोग सर्व क्षेत्रात होताना दिसत आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग कृषी क्षेत्रामध्ये जर केला तर भारतीय शेतीमध्ये अमुलाग्र बदल होतील. तिफन स्पर्धेमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या यंत्रांमुळे शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य होईल असे प्रतिपादन जॉन डियर प्रा. लिमिटेडचे कार्पोरेट अफेयर्सचे संचालक श्री. मुकुल वार्षनेय यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान तिफन 2025 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ट्रॅक्टरचलित भाजीपाला पुनरलागवड यंत्रे या विषयावरील या स्पर्धेचा समारोपप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात श्री. मुकुंद वार्षनेय अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंडियाचे अध्यक्ष डॉ. गोविंदराज नागराजन उपस्थित होते. यावेळी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रवींद्र बनसोड, कमिन्सचे अध्यक्ष श्री. अभिजीत फडके, सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंडियाचे श्री. अजय अग्रवाल, सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंडियाचे ऑफ हायवे अध्यक्ष डॉ. कृष्णांत पाटील, श्री.रवींद्र सिंग, कार्यक्रमाचे संयोजक श्री. संदीप राजपूत व अल्टेर कंपनीचे प्रमुख श्री.बी. एस. रमेशा उपस्थित होते.
यावेळी डॉ. गोविंदराज नागराजन आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेले डिझाईन तसेच नवकल्पना या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या आहेत. सध्याचे हे युग नवीन तंत्रज्ञानाचे असून ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेतीमधील कठीण कामे सुलभ होतील. या स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा दृष्टिकोन, त्यांच्यामध्ये असलेले कौशल्य तसेच ज्ञानामुळे विविध कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच त्यांना स्टार्टअपच्याही संधी उपलब्ध होतील हेच तिफन 2025 या स्पर्धेचे यश आहे. यावेळी डॉ. रवींद्र बनसोड, डॉ. कृष्णांत पाटील, श्री अभिजीत फडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. संदीप राजपूत यांनी तिफन 2025 च्या प्रवासाविषयी माहिती दिली. यावेळी या तिफन 2025 या स्पर्धेतील विविध पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्रथम विजेता संघ ठरला पुणे येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संघ यांना ₹१,००,०००/- आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. पहिल्या उपविजेतेपदाचे बक्षीस ₹७५,०००/- संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघास सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. द्वितीय उपविजेतेपदाचे बक्षीस ₹ ५०,०००/- लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठाचा संघ व पुणे येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघास विभागून देण्यात आले. यावेळी विविध ८ प्रकारातील (मार्केटिंग, डिझाईन, किफायतशीर, कार्यक्षम व इतर) विजेत्या संघास मान्यवरांच्या हस्ते रोख ₹२५०००/- ची पारितोषिके आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच या स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये सहभागी सदस्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी या स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून काम केलेल्या विविध कंपन्यांना मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी डॉ. कृष्णांत पाटील यांनी पुढील वर्षी होणाऱ्या तिफन 2026 या स्पर्धेचे समन्वयक म्हणून शितल कोलते व सहसंयोजक म्हणून श्री. रोहन जगदाळे यांच्या नावाची घोषणा केली. या कार्यक्रमासाठी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी तसेच संयोजक कमिटीचे पदाधिकारी पराग चौधरी, सुशांत कदम, संदीप बुरली, ऋषिकेश शिंदे, कुलदीप सिंगल, अजय अग्रवाल, विनयकुमार इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी खंडार व यशोदा भणगे यांनी तर आभार कृषी यंत्र व शक्ती विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे यांनी मानले.
