

कोपरगाव प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कृषी विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आधुनिक मोबाईल बँकिंग ॲप व दिनदर्शिका २०२६ चे दिमाखदार लोकार्पण सोहळा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे व पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नारायण मुसमाडे उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. विलास खर्चे म्हणाले की संस्थेच्या ५० वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे मोठे महत्त्व आहे. डिजिटल युगाशी जुळवून घेण्यासाठी संस्थेने सुरू केलेले मोबाईल ॲप सभासदांसाठी अत्यंत सोयीचे ठरेल. पतसंस्था पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने चालवली जात असल्याचे समाधान आहे. भविष्यातही पतसंस्था आधुनिकतेचा स्वीकार करत सभासदांच्या हितासाठी नावीन्यपूर्ण योजना राबवून अधिक सक्षम आणि आदर्श सहकारी संस्था म्हणून आपली ओळख अधिक दृढ करेल असा विश्वास व्यक्त करून पतसंस्थेच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. नारायण मुसमाडे यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या ५० वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते दिनदर्शिका व मोबाईल ॲपचे औपचारिक विमोचन करण्यात आले. या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन सौ. माधुरी अवताडे यांनी केले तर आभार डॉ. विक्रम कड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, पतसंस्थेचे संचालक श्री. दत्तात्रेय कदम, श्रीमती भारती बरे, श्री. आप्पासाहेब चोपडे, श्री. योगेश भिंगारदे, पतसंस्थेचे सचिव श्री. दीपक आढाव तसेच सेवकवर्ग व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
