विकसीत भारत 2047 साठी आधुनिक, शाश्वत आणि पर्यावरणपुरक तंत्रज्ञानाची आवश्यकता:- सहाय्यक महासंचालक डॉ. बिमलेश मान…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
भारतीय शेती ही देशाच्या अर्थ व्यवस्थेचा कणा असून देशातील 50 टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. कृषि क्षेत्राच्या जीडीपीमध्ये उद्यानविद्या पिकांचा 30 टक्के वाटा आहे. उद्यानविद्या पिकांमध्ये मोठी क्षमता असून त्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी शाश्वत तंत्रज्ञानावर काम करणे गरजेचे आहे. आपण अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण असलो तरी विकसीत भारत 2047 साठी उत्पादन दुप्पट होणे गरजेचे आहे. यासाठी आधुनिक, शाश्वत आणि पर्यावरणपुरक तंत्रज्ञानाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान संस्थेच्या शिक्षण नियोजन व गृह विज्ञान विभागाच्या सहाय्यक महासंचालक डॉ. बिमलेश मान यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील उद्यानविद्या विभागांतर्गत असलेल्या उद्यानविद्या (फळपिके) विभागातील प्राध्यापकांसाठी अद्ययावत प्रशिक्षण केंद्रामार्फत हवामान बदल ः कमी वापरात असलेल्या दुर्लक्षित फळपिकांच्या उत्पादन तंत्रज्ञानामध्ये अलिकडच्या काळातील प्रगती या विषयावरील 21 दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणुन डॉ. बिमलेश मान बोलत होत्या. दि. 5 ते 25 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत हे राष्ट्रीय प्रशिक्षण होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के होते. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, उद्यानविद्या विभाग प्रमुख तथा प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालक डॉ. बी.टी. पाटील, सहयोगी संशोधन संचालक डॉ. विष्णू गरांडे, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड व नोडल अधिकारी डॉ. एम.आर. पाटील उपस्थित होते.
यावेळी डॉ. बिमलेश मान पुढे म्हणाल्या की विकसीत भारत 2047 चे ध्येय गाठायचे असेल तर भाजीपाल्यासाठी उत्तम प्रतिचे बियाणे, फळे साठविण्यासाठी तालुका पातळीवर शितगृहे, अद्ययावत गोडावून, तालुका पातळीवर कस्टम हायरींग सेंटर यासारख्या पायाभुत सुविधा तसेच उद्यानविद्या पिकांमध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर आणि फळप्रक्रिया केंद्रे उभे राहण्याची आवश्यकता आहे. याप्रसंगी डॉ. विठ्ठल शिर्के आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात म्हणाले की देशातील वाढत्या लोकसंख्येची फळांची गरज भागविण्यासाठी तसेच फळांपासून काढणी पश्चात तंत्रज्ञानातून उपपदार्थ निर्मिती केली तर फळपिके उत्पादक शेतकर्यांना आर्थिक फायदा होईल. त्यासाठी फळांपासून उपपदार्थांची निर्मिती करतांना फळांची मुळ गुणवत्ता व पौष्टीक मुल्यांची जपणुक करणे महत्वाचे आहे. दुर्लक्षीत फळपिकांमध्ये अधिक पौष्टीक गुणधर्म असल्यामुळे त्यांच्यावर अधिक संशोधन करणे गरजेचे आहे. आपल्या देशाची खरी संपत्ती ही विविध राज्यात आढळणारी फळपिके आहेत. या फळपिकांना त्या त्या विभागातील हवामानानुसार अनुरुप अशी गुणवैशिष्ट्ये लाभलेली आहेत. या फळपिकांपासून काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा वापर करुन उपपदार्थ निर्मिती करतांना वापरण्यात येणारे तंत्रज्ञान शाश्वत व पर्यावरणपुरक असावे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बी.टी. पाटील यांनी या प्रशिक्षणाची रुपरेषा तसेच आत्तापर्यंत घेतलेल्या प्रशिक्षणांचा आढावा सादर केला. या 21 दिवसीय प्रशिक्षणामध्ये 53 विविध विषयांवर व्याख्याने तसेच पाच अभ्यास दौरे आयोजीत करण्यात आले आहेत. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रासह सहा राज्यातील 25 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. राजेंद्र क्षिरसागर यांनी तर आभार प्रशिक्षण कार्यक्रमासे सहसमन्वयक डॉ. जितेंद्र ढेमरे यांनी मानले. यावेळी उद्यानविद्या विभागातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *