संजीवनी इंटरनॅषनल डीपार्टमेंटचे यश..!
कोपरगांव प्रतिनिधी:-
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतिय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील संकेत सुरेश इंगळे याची कॅनडा सरकारच्या मिटॅक्स ग्लोबलिंक रिसर्च इंटर्नशिप्स या संस्थेमार्फत कॅनडामधिल ओंटॅरिओ प्रांतातील युनिव्हर्सिटी ऑफ विंडसोर मध्ये ३ महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी (अंतर्वासिता) निवड झाली आहे. या कालावधीमध्ये त्याला रू ५ लाखांचे स्टायपेंडही मिळणार आहे. महाराष्ट्रातून निवड झालेल्या ४ विद्यार्थ्यांपैकी संकेत हा एकमेव ग्रामीण भागातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विध्यार्थी आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी म्हटले आहे की भारतातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या व संशोधनात्मक प्रतिभा संपन्नता असलेल्या विध्यार्थ्यांना विध्याथ्र्यांना संशोधनकामी इंटर्नशिप करता यावी यासाठी भारत सरकारच्या अखत्यारीतील आखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई), नवी दिल्ली या संस्थेने कॅनडा सरकारच्या मिटॅक्स ग्लोबलिंक रिसर्च इंटर्नशिप्स या संस्थेबरोबर सामंजस्स करार (एमओयु) केला आहे. या उपक्रमांतर्गत भारतातील सुमारे ५० विध्यार्थ्यांची मे ते जुलै या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी निवड होत असते. यात मुख्यत्वेकरून आयआयटी, एनआयटी, उच्च गुणवत्ताधारक शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालये यातीलच विध्यार्थ्यांची निवड होण्याची परंपरा आहे. चालु वर्षी महाराष्ट्रातील फक्त ४ विध्यार्थ्यांचा या निवडीमध्ये समावेश आहे. यात संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय जरी कोपरगांव सारख्या ग्रामीण भागात असले तरी संजीवनीच्या संकेतने संस्थेत असलेल्या संजीवनी इंटरनॅशनल डीपार्टमेंटच्या मार्गदर्शनाखाली या निवडीमध्ये बाजीमारून संजीवनीच्या वैभवात भर घातली.
दरवर्षी निवड झालेल्या अशा विध्यार्थ्यांना कॅनडाच्या ७० पैकी सांगण्यात आलेल्या एका विद्यापीठात जावुन इंटर्नशिप अंतर्गत संशोधन कार्य करावे लागत असे. परंतु यावर्षी कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे तेथिल विद्यापीठातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्हर्चुअल पध्दतीने इंटर्नशिप करावी लागणार आहे. संकेतला ‘फ्लो पास्ट ब्रीज पायर्स अँड स्कौर’ या विषयावर येथे राहुनच संशोधन करायचे आहे, मात्र व्हर्चुअल पध्दतीने त्याला तेथिल प्रयोगशाळांचाही वापर करायचा आहे. संकेतच्या या राष्ट्रीय पातळीवरील यशाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री श्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांनी संकेत व त्याच्या आई वडीलांचे अभिनंदन करून त्याच्या संशोधन कार्यास शुभेेच्छा दिल्या.
श्री अमित कोल्हे यांनीही संकेतचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी टेक्निकल ऑफिसर श्री विजय नायडू, डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर, विभाग प्रमुख डाॅ. मच्छिंद्र पुरकर, मार्गदर्शक डाॅ. महेंद्र गवळी उपस्थित होते.

फोटो ओळी:- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी संकेत इंगळे या विध्यार्थाची कॅनडा विद्यापीठात इंटर्नशिपसाठी निवड झाल्याबध्दल सत्कार केला. यावेळी श्री विजय नायडू, डाॅ. ठाकुर, डाॅ. पुरकर व डाॅ. गवळी उपस्थित होते.
