अहमदनगर जिल्ह्याच्या विकासात के. बी. साहेबांचे कार्य प्रेरणादायी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
“महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील के. बी. रोहमारे हे या जिल्ह्याचे वैभव होते. त्यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांमुळे आज खेड्यापाड्यातील व झोपडीतील माणूसही शिक्षण घेतो आहे. के. बी. रोहमारेंसारख्या लोकांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समाज सुधारणा हे ध्येय बाळगले होते. त्यामुळेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिक्षण संस्थांची स्थापना झाली व शिक्षणाबरोबरच कल्याणकारी राजकारण करणारे नेते निर्माण झाले. “ असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री मा.बबनराव ढाकणे यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमय्या महाविद्यालयात माजी आमदार के. बी. रोहमारे जन्मशताब्दी समारोप व गोदातरंग या के. बी. रोहमारे जन्मशताब्दी विशेषांकाचे प्रकाशन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा.अशोकराव रोहमारे हे होते तर संस्थेचे सचिव एड. संजीव कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
“मा. ढाकणे साहेब पुढे म्हणाले की “आजचा काळ हा मूल्यांच्या ऱ्हासाचा काळ आहे. आजच्या राजकारणावर मी फार बोलणार नाही, परंतु राजकारण व समाजकारण करू इच्छिणाऱ्यांनी त्यागाची भावना ठेवली पाहिजे. रावसाहेब पटवर्धन यांच्यासारखे नेते, ज्यांनी राष्ट्रपतीपद ही नाकारले होते. त्याचबरोबर सेनापती बापट, बाळासाहेब भारदे यांच्यासारख्या स्वातंत्र्य चळवळीतील महापुरुषांचे आपल्यावर थोर उपकार आहेत. मात्र स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपल्याला देश चालवण्यासाठी माणसे घडवावी लागणार आहेत. त्या दृष्टीने के. जे. सोमैया महाविद्यालय हे विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण व संस्कार देत आहे, ही सर्वांसाठी भूषणावह बाब आहे. के. बी. साहेबांनी शिक्षण, शेती, सहकार व राजकारणात खूप मोठे काम केले आहे. त्याचाच संपन्न वारसा त्यांचे सुपुत्र मा. अशोकराव रोहमारे व तरुण तडफदार नातू मा.संदीपराव रोहमारे हे चालवित आहेत. के. बी. साहेबांसोबत मी पन्नास वर्षे काम केले. त्यांच्यामुळेच अनेकांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त झाली. आज मुली देखील शिक्षणाच्या व प्रशासनाच्या क्षेत्रात यशस्वी होत आहेत. पाथर्डी येथील एका सामान्य कुटुंबातील एक मुलगी वैमानिक बनून शंभर तास विमान चालवते हे बघितल्यानंतर मला समाधान वाटते. मात्र ते करत असताना त्यांना घरही चालविता आले पाहिजे. जिल्हाधिकारी असणाऱ्या आजच्या महिलांना जिल्ह्याबरोबरच घराचेही व्यवस्थापन करता आले पाहिजे.”
या प्रसंगी चांदवड येथील प्रसिद्ध ग्रामीण कवी व चित्रपट गीतकार मा. विष्णू थोरे असे म्हणाले की, “जगण्याच्या विसंगतीतून वाट काढण्याचा हा कठीण काळ आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांनी समाजातील शक्य तेवढ्या वाईट गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे.”
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे म्हणाले की, “बबनराव ढाकणे हे बाळासाहेब भारदे यांचे शिष्य व निष्ठावंत नेते आहेत. के. बी. साहेबांना तर त्यांनी सतत सहकार्य केले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण के. बी. साहेबांना नगर जिल्ह्याचे कारभारी म्हणत असत. त्या काळात केली के. बी. साहेबांनी शंभर सोसायटया स्थापन करून तालुक्यात सहकार चळवळ रुजवली व पुढे संजीवनी सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचा संकल्प केला, त्या कारखान्याचे ते चीफ प्रमोटर होते.”
याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते महाविद्यालयाच्या ‘गोदातरंग’ या के. बी. रोहमारे जन्मशताब्दी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. ‘गोदातरंग’ विशेषांकाचे संपादक प्रो. जिभाऊ मोरे यांनी प्रास्ताविक करतांना विशेषांकाची पार्श्वभूमी व त्याचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रो. एस. एल. अरगडे यांनी केले. याप्रसंगी सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ व माजी नगरसेवक डॉ. अजेय गर्जे आणि श्रीमती कावेरी राऊत यांना उद्योजिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला. ‘गोदातरंग’ विशेषांकाच्या संपादक मंडळाचा देखील सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास केदारनाथ सहकारी साखर कारखान्याचे (पाथर्डी) चेअरमन मा. ऋषिकेश ढाकणे, मा. सिद्धेश ढाकणे, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक मा. जवाहरलाल शहा, मा. सुनील शिंदे, मा. एड. संजय भोकरे, मा. संदीप रोहमारे, मा. एड. राहुल रोहमारे, मा. गौरव कोऱ्हाळकर, मा. सुरेश शिंदे, श्री. इथापे, गोदामाई प्रतिष्ठानचे मा.आजिनाथ ढाकणे, मा. सुजित रोहमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. व्ही. सी. ठाणगे, डॉ. गणेश देशमुख, प्रो. एस. एल. अरगडे, डॉ. वसुदेव साळुंके, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, प्रा. वर्षा आहेर, डॉ. सुरेखा भिंगारदिवे इत्यादी प्राध्यापक तसेच श्री. संजय वेताळ, श्री. रोहित लकारे इत्यादी सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो ओळ :- 1. के. बी. रोहमारे जन्मशताब्दी समारोप व गोदातरंग प्रकाशन समारंभात उपस्थितांना संबोधित करतांना मा.बबनराव ढाकणे

  1. गोदातरंग वार्षिकांकाच्या ‘के.बी. रोहमारे जन्मशताब्दी विशेषकांकाचे’ प्रकाशन करताना मा बबनराव ढाकणे कवी विष्णू थोरे अशोकराव रोहमारे इत्यादी मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *