

कोपरगांव प्रतिनिधी:- येथील रहिवाशी व पापड उद्योग व्यवसायात यशस्वी वाटचाल करून नावलौकिक मिळविलेल्या संस्कृती पापड उद्योजक श्री विशाल राऊत व सौं कावेरी राऊत यांना भारत सरकारचा आदर्श उद्योजक व उद्योजिका पुरस्कार नुकताच महाराष्ट्र सदन, दिल्ली या ठिकाणी प्रदान करण्यात आला. भारत सरकारच्या राज्यमंत्री भारतीताई पवार, खासदार हेमंत गोडसे, खासदार सदाशिव लोखंडे, लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब आहेर तसेच उद्योजक जगतातील विविध मान्यवर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्योजक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे त्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तु देऊन सन्मानित करण्यात आले.
मागील अनेक वर्षांपासून श्री. विशाल राऊत व सौं कावेरी राऊत यांनी संस्कृती पापड व्यवसायाच्या माध्यमातून आपला नावलौकिक मिळविलेला आहे. अनेक नव-तरुणांना रोजगाराच्या संधी व प्रेरणा देण्याचे काम राउत परीवार आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून करत आहे. तसेच या परिवाराचा सामाजिक कार्यात सतत सहभाग असतो. उद्योजक श्री. विशाल राउत हे कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयातील माजी विद्यार्थी असून त्यांच्या जडणघडणीत या महाविद्यालयाचे महत्वाचे योगदान आहे. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल कोपरगांव परिसरातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

