बैलगाडा शर्यतीचा लढा सामूहिक प्रयत्नामुळे जिंकता आला:- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(शिर्डी):- बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकाल हा सर्वस्वी मायबाप शेतकऱ्यांचा विजय आहे. १२ वर्षापासून सुरू असलेला लढा सामूहिक प्रयत्नामुळे जिंकता आल्याचे समाधान राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले असून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे त्यांनी मनापासून स्वागत केले आहे.
महसूलमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी यासाठी अनेक वर्षे लढा देत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गेल्या बारा वर्षापासून सुरू असलेल्या या लढ्याला न्याय मिळावा म्हणून केलेल्या सामुहिक प्रयत्नांना यश मिळाले आहे.
या स्पर्धाकरीता सरकारने यापूर्वीच केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला, याचे मोठे समाधान आजच्या निकालातून मिळाले आहे. राज्य सरकारने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नामवंत वकीलांची टिम उभी केली होती. बैलगाडा संघटनेसमवेत सातत्याने बैठका सुरू होत्या.
बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात ग्रामीण भागात मोठी आत्मियता आहे. या स्पर्धेतून रोजगारही निर्माण होत असल्याने या स्पर्धा पुन्हा सुरू करण्यास मिळालेला हिरवा कंदील मायबाप शेतकऱ्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे. खिल्लारी देशी गोवंश संवर्धनाच्या दृष्टीने आजचा निकाल पाठबळ देणारा ठरेल. असा विश्वास महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *