
कोपरगाव प्रतिनिधी:-“अरबी भाषेतून जन्मलेली गझल फारसी मधून प्रवास करीत उर्दूची पट्टराणी झाली. मराठीसाठी ती परकी असली, तरी मराठीत तिला जागविण्याचा प्रयत्न अमृतराय, मोरोपंत यांनी केला. अशा रीतीनें मराठीत निर्माण झालेली गझल केवळ प्रेमभावनेपुरती थांबलेली नाही; तर मराठी गझल ही समाजभान आणून देणारी आहे. समाज रचनेला संतुलितपणा देणाऱ्या प्रेमभावनेलाच आज कीड लागलेली आहे. मात्र, या प्रेम भावनेला समाजभान देण्याचे काम मराठी गझल या साहित्य प्रकाराने केले आहे”.असे डॉ.अविनाश सांगोलेकर यांनी सांगितले.
येथील एस.एस.जी.एम.महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे’ उद्घाटन नुकतेच त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ‘अविनाशपासष्टी’ या गझल कार्यक्रम सादरीकरण प्रसंगी ते बोलत होते.
‘मराठी गझल परंपरा’ आणि खऱ्या अर्थाने ‘मराठी गझल’ला ओळख देणाऱ्या ‘सुरेश भटां’विषयी माहिती देऊन डॉ.सांगोलकर यांनी याप्रसंगी कर्मवीर,शिक्षण,आरक्षण,विनोद,पतंग,माणूस अशा विविध विषयांवर आपल्या गझल सादर करत उपस्थितांना वास्तवाची जाणीव करून दिली.तसेच चिंतन प्रवृत्त केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयातील कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. सुभाष रणधीर यांनी भूषविले. कवी हे जसे कलाकार असतात तसेच समाज शिक्षक असतात. आपल्या साहित्य लेखनातून समाजाचे नैतिक सांस्कृतिक शिक्षण करीत समाजाला सुसंस्कृत रूप देण्यामध्ये त्यांचे मोलाची योगदान असते,असे सांगून डॉ. रणधीर यांनी ‘अविनाशपासष्टी’ सादर करून विद्यार्थ्यांचे रंजन व उदबोधन करणाऱ्या सांगोलेकरांना मनःपूर्वक धन्यवाद दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी केले. तर उपस्थितांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचे काम मराठी विभाग प्रमुख डॉ. उज्ज्वला भोर यांनी केले. प्रा. देवकाते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.रंजना वर्दे,प्रा.डॉ.वैशाली सुपेकर प्रा. सुनील काकडे, प्रा. रोहम,प्रा.वाघ प्रा.हाडोळे,सुनील ढगे,प्रा.शेळके यांसह महाविद्यालयीन अधीक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

