
कोपरगाव प्रतिनिधी:-
के. जे. सोमय्या कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, कोपरगाव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 9 जानेवारी ते 15 जानेवारी 2023 या कालावधीत डाऊच बुद्रुक येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. सचिनजी सूर्यवंशी, को.ता.एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांच्या हस्ते संपन्न झाले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मा. सचिनजी सूर्यवंशी म्हणाले की, ‘ प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या
व गावाच्या विकासाठी पुढे येऊन या श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून समाजासाठी योगदान दिले पाहिजे. यासाठी निवडलेल्या गावाचे लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने सर्वेक्षण करून चांगल्या गोष्टींबरोबरच आवश्यक गोष्टींसाठी शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे. गाव विकासासाठी शासनाच्या विविध योजना समजून घेऊन आपल्या माध्यमातून त्या शेवटच्या घटकापर्यंत कशा पोहचतील यासाठी सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रसंगी मा. अशोकराव रोहमारे यांनी डाऊच बुद्रुक गावाबद्दलची आत्मीयता व्यक्त करतांनाच प्रत्येकाने गावविकासाठी आपले मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालातील एन. एस. एस. विभागाच्या कामाचे कौतुक करतांनाच या शिबिराच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण व अंधश्रद्धा निर्मूलन या सारख्या कामास प्राधान्य द्यावे असे सांगितले या उद्घाटन प्रसंगी कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक मा. रोहिदास होन, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. संदिप रोहमारे, रजिस्ट्रार डॉ.अभिजित नाईकवाडे, हिंदी विभागप्रमुख डॉ.संजय दवंगे, सरपंच मा. दिनेश गायकवाड, उपसरपंच मा. भिवराव दहे, मा. बाजीराव होन, माजी सैनिक राजेंद्र गायकवाड, सदस्या सौ. उषाताई ढमाले,कल्याण ढमाले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. कांतीलाल दहे , जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मा. शेख सर व इतर उपशिक्षक इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ बी. एस. गायकवाड, सह कार्यक्रम अधिकारी डॉ.एस.एस. नागरे , प्रा. डॉ.एस. के. बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
