
कोपरगाव प्रतिनिधी:-
राजस्थानातील उदयपूर येथे झालेल्या जागतिक पाणी परिषदेत कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी सहभाग नोंदविला. या परिषदेत जागतिक पाणी आयोगाच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. याबद्दल कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने ढाकणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ढाकणे यांच्या या निवडीबद्दल भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी ढाकणे यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी किरण सुपेकर, दादासाहेब नाईकवाडे, जयेश आव्हाड, सचिन सावंत, सुनील मुंगसे, रावसाहेब सुपेकर, समीर सुपेकर, राहुल सुपेकर, भाऊसाहेब धात्रक, राहुल शेजळ आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. आदिनाथ ढाकणे हे सामाजिक बांधिलकी म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, पर्यावरण संतुलन तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृतीचे काम करीत आहेत. ‘स्वच्छता दूत’ म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. ‘दक्षिण गंगा’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या आणि कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठीसुद्धा ते काम करीत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून वेगवेगळ्या पध्द्तीने ते जनसामान्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्त्व पटवून देत आहेत. तसेच ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ या संकल्पनेतून पाण्याचे महत्त्व पटवून देत मिळेल त्या ठिकाणी देशी वृक्षाची लागवड व संगोपन करत पर्यावरण संतुलनाचे कार्यही ते करीत आहेत. ‘एक झाड आपल्या जीवासाठी’ अशी आगळीवेगळी संकल्पना राबवत जल व वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करणारे आदिनाथ ढाकणे हे चित्रपट अभिनेता चिन्मय उदगीरकर व राजेश पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी समाजात जागृती करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत.
आदिनाथ ढाकणे यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत उदयपूर येथे नुकत्याच झालेल्या जागतिक पाणी परिषदेत त्यांना अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. तसेच ढाकणे यांच्या कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग यांनी ढाकणे यांची जागतिक पाणी आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे. या परिषदेत ढाकणे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. ढाकणे यांच्या या नियुक्तीबद्दल भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी ढाकणे यांचे संजीवनी उद्योग समूह, भारतीय जनता पक्ष आणि कोल्हे परिवाराच्या वतीने अभिनंदन केले. आदिनाथ ढाकणे यांची जागतिक पाणी आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ही नियुक्ती म्हणजे ढाकणे यांच्या कार्याचा सन्मान आहे, असे कौतुकोद्गार स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी काढले.
