शेतकऱ्यांचा महत्वाचा सण बैल पोळा पोळ्याची गोडीच वेगळी:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- बैल पोळा याला काही भागात ‘ बेंदुर ‘ म्हणून साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात व शहरी भागातही बैलगाडी जोरात होती. शेतकऱ्यांचा बैल- बारदाना मोठा होता. कालौघात यंत्रयुग आले पिढी बदलून गेली . मानवी जीवन बदलून गेले.यंत्रयुगामुळे सर्व कामे फटाफट होऊ लागली. मोट नाडा, बैलगाडी, दोन चार सहा बैलांचा नांगर काळाच्या पडद्याआड गेला.


गायगोठा सांभाळताना दोन चार बैल दावनिला असत. आपल्या घरची व सोयरयाची जमीन नांगरून पेरून दिली जायची. लग्नाचं वर्हाडी बैलगाडीने जायचं. वळहयी चारा खूप लागायचे. घरचा घास, कडबा, वैरण शेवरया असत. हळूहळू सर्व लयाला जात आहे.
शेतकऱ्यांचा महत्वाचा सण बैल पोळा. पोळ्याची गोडीच वेगळी. आठ आठ दिवस आधी बैलांची शिंगे साळायची, शेपटीचा गोंडा करायचा, नाल ठोकायचा आणि मग पोळ्याच्या दिवशी सकाळी धुऊन सायंकाळी सजवून मिरवणूक. बैल धरण्यात मोठीच मजा. आता गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.
आता शेतकरी सुद्धा मातीच्या बैलांची पूजा करू लागले. शहरात आता मातीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरीस चे बैल येऊ लागले आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी हाताने मातीचा बैल बनवले जात आता साचे आले आहेत. दरवर्षी भाववाढ होत आहे परंतु विक्री कमी होत आहे. बैल कारागिर बाबा उपाध्ये यांनी सांगितले की, ‘ यंदा कच्च्या मालाची किंमत वाढली आहे, म्हणून बाजारात भाव वाढले आहेत पण पूर्वीसारखे गिरहाईक नाही. सदरचे बैल टिकाऊ असल्याने लोक शो केस मध्ये सांभाळून ठेवतात. बैल पोळ्यांचा सण झालेवर गणपती महालक्ष्मीची आरास करून बैल तसेच राहतात.
हळूहळू सर्व सण कमी होत आहे.
शहरातच काय पण ग्रामीण भागात सणांच महत्व कमी होते आहे.
असो कालाय तस्मै नमः
सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *