

कोपरगाव प्रतिनिधी:-
श्रावणात येणारा एक महत्वाचा उत्सव म्हणजे गोपाळकाला अर्थात दहीहंडी. हा उत्सव श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. जन्माष्टमीचा उत्सव भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. लहान वयापासूनच विद्यार्थ्यांवर भारतीय संस्कृतीचे संस्कार व्हावेत,या हेतूने शाळेत विविध उपक्रम आयोजित केले जातात. संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये शुक्रवारी संस्थेचे संस्थापक व शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला उत्सव साजरा करण्यात आला. शाळेच्या सकाळच्या प्रार्थने नंतर संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विशाल झावरे व सौ.वसुधा झावरे यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेतील शिक्षकांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपालकाल्याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण दहीहंडीचे होते. गोविंदा रे गोपाळा असा सूर काढत संगीतमय वातावरणात नृत्याचा ठेका धरत विद्यार्थांनी दहीहंडी फोडली. दहीहंडी फोडताना शाळेने पूर्ण सुरक्षेची काळजी घेतली होती. शाळेच्या आवारात दहीहंडी उभारण्यात आली होती. शाळेत उभारलेली दहीहंडी फोडून विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. नर्सरी ते दहावी मधील काही विद्यार्थ्यांनी राधा-कृष्ण,सुदामा व गौळणी चे तर काहींनी पारंपरिक पोशाख परिधान केले होते. गाण्यांच्या तालावर विद्यार्थ्यांनी ठेका धरल्याने वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारला होता. या उपक्रमाचे पालकांनी भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
