

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्वाधिक १ लाख २१ हजार रुपयांचे बक्षीस


- इगतपुरीच्या संग्राम युवा गोविंदा पथकाने फोडली श्री छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी
-विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात साजरा झाला लक्षवेधी दहीहंडी उत्सव… - कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भव्य-दिव्य श्री छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी उत्सव-२०२२ ला गोविंदा पथकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात साजरा झालेल्या या दहीहंडी उत्सवात कोपरगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील गोविंदा पथकांनीही सहभाग नोंदविला होता. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील संग्राम युवा गोविंदा पथकाने तब्बल सहा थर लावून ही मानाची दहीहंडी फोडली आणि १ लाख २१ हजार रुपयांचे बक्षीस जिंकले. “चला हवा येऊ द्या” फेम सुप्रसिध्द अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगलेल्या या दहीहंडी उत्सवात यंदा प्रथमच एवढ्या मोठ्या रकमेचे पारितोषिक देऊन संजीवनी युवा प्रतिष्ठानने बाजी मारली.
संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि युवा नेते विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलेला हा दहीहंडी उत्सव कोपरगावकरांच्या कायम स्मरणात राहील असाच होता. डीजे आणि बॅंड पथकाच्या गीत-संगीताच्या तालावर, ढोल-ताशांच्या गजरात तसेच “हाथी घोडा पालकी, जय कन्हैयालाल की, गोविंदा आला रे आला, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, गोविंदा रे गोपाला” अशा गगनभेदी घोषणा देत एकामागोमाग एक थर लावून दहीहंडी फोडण्यासाठी चुरशीने मैदानात उतरलेले गोविंदा, आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, बेधुंद होत थिरकणारी तरुणाई, भगवान श्रीकृष्णाच्या आकर्षक वेशभूषेत सहभागी झालेले बालगोपाल आणि गोविंदा पथकांना प्रोत्साहन देत उत्साह वाढवणारी नागरिकांची तोबा गर्दी असे अभूतपूर्व दृश्य कोपरगाव शहरात पहावयास मिळाले.
इगतपुरी (जि. नाशिक) येथील संग्राम युवा गोविंदा पथकाने पहिल्या राउंडला पाच थर रचत संजीवनी युवा प्रतिष्ठानची ही मानाची दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला; पण त्यात त्यांना यश आले नाही. मात्र, रात्री दहाच्या सुमारास दुसऱ्या राउंडला सहा थर रचत संग्राम युवा गोविंदा पथकाने ही मानाची दहीहंडी फोडत १ लाख २१ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. संग्राम युवा गोविंदा पथकाला युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी फोडण्यासाठी विविध ठिकाणच्या गोविंदा पथकांमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली होती. युवा बेलदार समाज, सोनार वस्ती, धारणगाव, राजमुद्रा प्रतिष्ठान, गांधीनगर, कोपरगाव, हनुमाननगर मित्रमंडळ, कोपरगाव, अल्ताफभाई पठाण यांचा आक्सा ग्रुप, जय बजरंग तरुण मंडळ, संजयनगर, जुबेर खाटिक मित्रमंडळ, धर्मयोद्धा शामभाऊ प्रतिष्ठान, गांधीनगर, कोपरगाव, वासुदेव जोशी समाज, मोहनीराजनगर , कोपरगाव आदी गोविंदा पथकांनी ही दहीहंडी फोडण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही. शेवटी इगतपुरी (जि. नाशिक) येथील संग्राम युवा गोविंदा पथकाने दुसऱ्या राउंडला सहा थर रचत ही मानाची दहीहंडी फोडत बक्षिसावर आपले नाव कोरले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर रंगलेला दहीहंडी उत्सवाचा थरार अनुभवण्यासाठी आणि गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि युवा नेते विवेकभैय्या कोल्हे हे स्वत: दहीहंडी फोडण्यासाठी धडपडणाऱ्या गोविंदा पथकांना प्रोत्साहन देताना दिसत होते. दोन वर्षानंतर कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर यंदा प्रथमच मोकळ्या वातावरणात दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जल्लोषपूर्ण वातावरणात आणि शांततेत साजरा झालेला हा दहीहंडी उत्सव नेटक्या नियोजनामुळे लक्षवेधी ठरला. या दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून विवेकभैय्या कोल्हे यांनी आपली जबरदस्त छाप पाडल्याचे प्रकर्षाने दिसून आले. नागरिकांकडून त्यांना मिळालेला अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आगामी काळात कोपरगाव तालुक्याच्या नेतृत्वाची धुरा विवेकभैय्या कोल्हे यांच्या हाती जाणार याची जणू नांदीच या दिमाखदार सोहळ्यातून स्पष्टपणे दिसून आली. कोपरगाव
शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सुरक्षा कर्मचारीही बंदोबस्तासाठी तैनात होते. कसलेही गालबोट न लागता हा दहीहंडी उत्सव शांततेत पार पडला. कोपरगावकरांनी मोकळ्या वातावरणात या दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटला.

