
कोपरगाव प्रतिनिधी:-
सध्या मोठ्या प्रमाणात भूतलावर प्रदूषणात वाढ होत असून यातून अनेक प्रकारच्या व्याधी मनुष्याला जडत आहेत. तसेच झाडाच्या बेसुमार तोडी मुळे पावसाचे प्रमाण देखील कमी झाले आहे तर अनेक ठिकाणच्या जमिनी नापीक झाल्याने संपूर्ण शेती व्यवस्था मोडकळीस आल्याचे चित्र सध्याच्या परिस्थिती वरून पहावयास मिळत असून त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने प्रत्येकाने काळजीपूर्वक पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मनापासून प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जालना येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांनी व्यक्त करत प्रत्येक विद्यार्थ्यांने किमान एक देशी वृक्षाची लागवड करत त्याची जपणूक करण्याचे आवाहन केले.
भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवाचा उत्सव संबंध भारतभर मोठ्या जल्लोषात साजरा होत असून त्याच अनुषंगाने कोपरगाव शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात मुख्याध्यापक सुरेश कातकडे व उपमुख्याध्यापिका राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी देशभक्ती पर आधारीत चित्रकला, वेशभूषा, वक्तृत्व, रांगोळी, मेहंदी,निबंध, समूह गायन, समूह नृत्य आदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ व स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता कार्यक्रम नुकताच जालना येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका सहसचिव विजय कापसे, शालेय शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा परदेशी ताई, प्रभारी पर्यवेक्षक काशिनाथ लव्हाटे, शाळेचे जेष्ठ शिक्षक शहाजी सातव आदी सह शालेय शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक करतांना पर्यवेक्षक लव्हाटे यांनी बोलतांना सांगितले की, स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाळेने विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम साजरे करत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती जागृत करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. तसेच या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोपरगाव तालुका सहसचिव विजय कापसे यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल तर कष्ट आणि प्रयत्न केल्या शिवाय काहीच साध्य होत नाही असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय शिक्षक स्वप्नाली औताडे, मनीषा कानडे, जयश्री आंबरे, प्रमिला चौधरी, देवराम साबळे,रतन दवंगे, मंगलदास बत्तीस, क्रीडा शिक्षक किरण बोळीज, एनसीसी विभाग प्रमुख नरेंद्र ठाकरे, नारायण चौरे, चैतन्य ढगे आदी सह शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका मनीषा पाटील यांनी केले तर उपस्थिताचे आभार जेष्ठ शिक्षक शहाजी सातव यांनी व्यक्त केले.
