कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- मागील अनेक वर्षापासून नागरिकांना विशेषतः महिला भगिनींना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण कायमची थांबविण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या भगीरथ प्रयत्नातून ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेच्या १३१.२४ कोटीच्या कामाचा कार्यारंभ आदेश नुकताच लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच ५ नंबर साठवण तलावाच्या कामाला प्रारंभ होवून वर्षानुवर्षापासूनचा पाणी प्रश्न ना. आशुतोष काळेंमुळे मार्गी लागला आहे. त्याबद्दल संपूर्ण शहरात नागरिकांना पेढे भरवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेढे भरवून आपला आनंद व्यक्त केला आहे.
कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कधी सुटणार, नागरिकांना केव्हा नियमित पाणी मिळणार याची कोपरगाव शहरातील नागरिकांना चिंता होती. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच कोपरगावचा पाणी प्रश्न सोडविण्याचा विडा उचलेल्या ना. आशुतोष काळे यांनी निवडून येताच योग्य नियोजन करून प्राथमिक स्वरूपातील खोदाई काम गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीकडून करून घेतल्यामुळे होणारा खर्च कमी करून पुढील कामासाठी निधी मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लावला. या कामाचा कार्यारंभ आदेश देखील लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिला असल्याची गोड बातमी शहरातील नागरिकांना ना. आशुतोष काळे यांनी दिली. ना. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देवून कोपरगाव शहराचा चेहरा-मोहरा बदलविला व त्याचबरोबर अत्यंत महत्वाचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न देखील मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. तर कार्यकर्त्यांनी कोपरगाव शहरातील नागरिकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला यावरून हा प्रश्न किती महत्वाचा होता हे सिद्ध होत आहे.

फोटो ओळ – ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेच्या १३१.२४ कोटीच्या कामास लवकरच प्रारंभ होणार असल्यामुळे नागरिकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते.
