कान्हेगाव रेल्वे स्थानकावर डेमू पॅसेंजरला थांबा मिळावा टेके पाटील ट्रस्टची मागणी; मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांना निवेदन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
मध्ये रेल्वेच्या मनमाड – दौंड रेल्वे मार्गावर धावणाऱ्या डेमू ( डी.ई.एम.यु.) पॅसेंजर गाडीला कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा, अशी कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील ट्रस्टच्या वतीने मुंबई येथील मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांना मंगळवारी (दि.५) ई-मेलद्वारे निवेदन देत मागणी केली आहे.
निवेदनात म्हंटले, कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वारी येथे कान्हेगाव रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावर पूर्वी नगर, दौंड, पुणे येथे जाण्यासाठी एकूण तीन पॅसेंजर गाड्या तर मनमाड, मुंबई, नांदेड येथे जाण्यासाठी तीन अशा वेगवेगळ्या वेळेत सहा पॅसेंजर गाड्या होत्या. कोरोणाच्या वैश्विक संकटामुळे दोन वर्षापूर्वी सर्व गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. अशातच गेल्या काही महिन्यापासून रेल्वे प्रशासनाने याच मार्गावरून डीझेल इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट ( डी.ई.एम.यु.) जालना ते पुणे ( क्र. ११४१० ) व पुणे – जालना ( क्र.११४०९ ) हि गाडी दररोज सुरु करण्यात आली आहे. मनमाड हून पुण्याकडे जातांना कान्हेगाव रेल्वे स्टेशनवरून सकाळी १२ वाजून १० मिनिटांच्या सुमारास जाते. तर पुण्याहून जालन्याला जातांना रात्री ८ वाजेदरम्यान बऱ्याचवेळी हि गाडी इतर गाड्यांच्या क्रोसिंगनिमित्त याच स्टेशनवर उभी राहत असते.
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वारी, कान्हेगाव, सडे, खोपडी, भोजडे, तळेगाव मळे, धोत्रे, गोधेगाव, दहिगाव बोलका, संवत्सर आदी गावातील ग्रामस्थांचा, प्रवाशांचा पूर्वीपासून कान्हेगाव रेल्वे स्थानकाशी संबंध आहे. तसेच वारी येथे गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडी हा जवळपास एक हजार कामगार असलेला स्वातंत्र्यपूर्व काळातील कारखाना या रेल्वे स्थानकाजवळ आहे. त्यामुळे येथून बहुसंख्य लोक रोज ये जा करत असतात. अनेक गावातील विविध पेन्शन धारक, शासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी, वैद्यकीय उपचारासाठी, नोकरीसाठी, शिक्षणासाठी विद्यार्थी हे श्रीरामपूर, अहमदनगर, मनमाड, औरंगाबाद येथे जातात. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःचे साधन नाहीत अशा नागरिकांची फार मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या गाडीला कान्हेगाव रेल्वे स्थानकावर थांबा देऊन नागरिकांना दिलासा द्यावा. असेही शेवटी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *