कोपरगाव बस आगार इमारत पुनर्बांधणी व स्थानकालगत व्यापारी संकुलासाठी १४ कोटी निधी मंजूर:- ना. आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- पिण्याच्या पाण्याची वानवा असलेल्या कोपरगाव शहराची रस्त्यांमुळे दुरावस्था होवून धुळगाव, टपऱ्यांचे शहर अशा अनेक उपाध्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे विकासाच्या बाबतीत मागे असलेले कोपरगाव शहर अशी कोपरगावची ओळख होवून बसली होती. मात्र श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून हि ओळख पुसली जात असून त्यांच्या भगीरथ प्रयत्नातून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे, शहरात नवीन रस्ते तयार झाले आहेत. बस आगार इमारत पुनर्बांधणी व स्थानकालगत व्यापारी संकुल उभारण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून तब्बल १४ कोटी निधी व्यापारी संकुलासाठी मंजूर झाला असल्याची माहिती ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव शहराच्या विकासाचे अनुत्तरीत प्रश्न मार्गी लावण्यासाठी ना. आशुतोष काळे यांनी महाविकास आघाडी सरकारकडून कोपरगाव शहरासाठी २६८ कोटी निधी आणला आहे. कोपरगाव शहराचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी १३१.२४ कोटी निधी ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी दिला आहे. त्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. रस्त्यांची झालेली दुरवस्था त्यामुळे बाजारपेठेवर परिणाम होवून बाजारपेठेला आलेली मरगळ याची दखल घेऊन शहरातील रस्ते व सुशोभीकरणासाठी देखील कोट्यावधी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे विकासाच्या बाबतीत कोपरगाव शहर शहराचे रूपडे बदलू लागले आहे. कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा, रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच कोपरगाव बस स्थानकात व्यापारी संकुल उभारले जाऊन स्थानिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता. त्याबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यांनी प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी परिवहन मंत्री ना. अनिल परब यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता. एप्रिल महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार कोपरगाव दौऱ्यावर आले असता त्यावेळी देखील ना. आशुतोष काळे यांनी बस स्थानका लगतच्या व्यापारी संकुलासाठी निधी द्यावा अशी मागणी त्यांच्याकडे केली होती. त्या वेळी जाहीर सभेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी निधी देण्याची ग्वाही ना. आशुतोष काळे यांना दिली होती.
दिलेला शब्द अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी पूर्ण करून कोपरगाव शहर बस आगार इमारत पुनर्बांधणी व बस स्थानकालगत व्यापारी संकुल उभारण्यासाठी १४ कोटी निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल ना. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,परिवहन मंत्री ना. अनिल परब, परिवहन राज्यमंत्री ना.सतेज पाटील यांचे आभार मानले आहे. व्यापारी संकुलाच्या माध्यमातून शहरातील उद्योग व्यवसायाला चालना मिळणार आहे. त्यामुळे बस आगार इमारत पुनर्बांधणी व बस स्थानकालगत व्यापारी संकुल उभारण्यासाठी १४ कोटी निधी मंजूर करून आणल्याबद्दल व्यापारी संघटनांनी ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *