
कोपरगाव प्रतिनिधी:-
तालुक्यातील मौजे मढी बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत रहिवासीयासाठी १ कोटी ५९ लाख रूपये खर्चाची जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाणी पुरवठयाची योजना मंजुर झाली असून त्यासाठी २५ मे २०२२ रोजी विहीर कामाचे भूमिपुजन होत असुन सदर योजनेसाठी पिण्यांच्या पाण्यांचा स्त्रोत हा क्षारयुक्त, मोहचळ पिण्यासाठी अयोग्य असल्याने हे काम स्थगित ठेवावे अशी मागणी मढी बुद्रुक येथील अमोल दिलीपराव गवळी, रविंद्र एकनाथ डहाळे व तेथील रहिवासीयांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पाणी पुरवठा मंत्री यांच्याकडे केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, सदर पिण्यांच्या पाणी पुरवठा योजनेचा पाण्याचा स्त्रोत हा क्षारयुक्त आहे त्यामुळे यावर होणारा सर्व खर्च वाया जाणार आहे, नागरिकांच्या आरोग्यास सदरचे पाणी घातक आहे त्यामुळे ही पाण्याची योजना फलदायी ठरण्याऐवजी अपायकारक ठरणार आहे, एवढ्या मोठ्या खर्चाच्या योजना ह्या वारंवार होत नसतात त्याचे काम एकदाच होत असते तेव्हा ती चांगल्या प्रकारे करण्यात यावे, मढी बुद्रुक रहिवासींच्या पिण्यांच्या पाण्यांचा स्त्रोत योग्य ठिकाणी विहीर घेवुन त्याबाबत संबंधीत विभागाचे भूजल निरीक्षण अहवाल घेवुनच विहीरीचे काम करण्यांत यावे, बुधवार दिनांक २५ मे रोजी होणा-या विहीर भूमिपुजन कार्यक्रमावर मढी बुद्रुक रहिवासियांचा तीव्र विरोध आहे. या निवेदनाच्या प्रती अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी अहमदनगर, तहसिलदार व गटविकास अधिकारी पंचायत समिती कोपरगांव व ग्रामसेवक मढी बुद्रुक ग्रामपंचायत यांच्याकडे सादर करण्यांत आल्या आहेत.
