
कोपरगाव प्रतिनिधी:- सिंचनाच्या पाणीपट्टीत झालेली वाढ रद्द करावी, तिन्ही हंगामात चारा व कांदा पिकाला पाणी मिळावे, सिंचनासाठी खरिपामध्ये पाणी मिळावे अशा विविध मागण्यांसाठी माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच नाशिक येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता आणि नाशिक विभागीय मुख्य अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन निवेदन दिले. गोदावरी डावा व उजवा कालवा हा बारमाही पद्धतीचा आहे आणि असे असताना वर्षभरात केवळ तीन ते चार आवर्तने मिळतात व त्यात बारमाही पीक नियोजन करणे शक्य होत नाही व त्यातच झालेली भरमसाठ पाणीपट्टी दरवाढ त्यामुळे आधीच नियोजन नसलेले आवर्तन आणि त्यात आता शासनाची पठाणी पाणी पट्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. २०१८ सालची झालेली दरवाढ रद्द करून २०११ च्या दराप्रमाणे पाणीपट्टी आकारावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनावर जल अभ्यासक पदमकांत कुदळे,प्रवीण शिंदे ,नितीन शिंदे,तुषार विध्वंस संतोष गंगवाल, सदाशिव रासकर आदींच्या स्वाक्षर्या आहे. यावेळी या शिष्टमंडळाने जलसंपदा उत्तर विभागाचे मुख्य अभियंता डॉक्टर संजय बेलसरे ,नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, उपविभागीय अभियंता तात्यासाहेब थोरात यांच्याशी पाण्यासांदर्भात चर्चा केली यावेळी पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे येत असताणा कोपरगाव तालुक्याला सिंचनासाठी पाणी मिळण्यासाठी ह्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये कोपरगावचा सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची गरज ओळखून वर्तमानात लढा देण्याची आहे. कोपरगावच्या राजकारणात काही हलचल करून खळबळ उडवून देण्याचा आमचा हेतू नाही आमचा लढा पाण्यासाठी आहे आणि पाण्यासाठीच राहणार असल्याचे पद्मकांत कुदळे यांनी स्पष्ट केले असुन पाण्यासाठी कोपरगाव करांनी एकत्र येत जनआंदोलन उभारण्याची गरज निर्माण झाली असल्याचे कुदळे यांनी म्हटले आहे.
