अभिनेत्री केतकी चितळेची आक्षेपार्ह टीका निंदनीय:- सौ. वैशाली आभाळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- राजकारणात काही विषयांवर मत-मतांतर असू शकतात. मात्र त्या आधारे खालच्या पातळीवर जावून आक्षेपार्ह टीका करणे हि आपल्या राज्याची संस्कृती नाही. त्यामुळे अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्यावर केलेली आक्षेपार्ह टीका निंदनीय आहे. कोपरगाव तालुका राष्ट्रवादी युवती संघटनेच्या सर्व महिला पदाधिकारी ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर निषेध करीत असल्याचे कोपरगाव तालुका राष्ट्रवादी युवती संघटनेच्या अध्यक्षा सौ. वैशाली आभाळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मराठी मालिकेतील अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्याप्रकरणी सौ. वैशाली आभाळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून अभिनेत्री केतकी चितळेचा सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने निषेध केला आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, सुसंस्कृत राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राची देशात वेगळी ओळख आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून महाराष्ट्रात एक परंपरा चालत आली आहे. त्यामुळे आपण कसं बोलावं, काय बोलावं, याचं प्रत्येकाने भान ठेवणे आवश्यक असून त्याचबरोबर आपण एक महिला आहोत याचा देखील केतकी नामक विकृतीला विसर पडला आहे. राज्याच्या राजकीय संस्कृतीत आजवर कुणीही, कधीही एवढ्या खालच्या पातळीवर जावून टीका-टिप्पणी केलेली नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी राज्याच्या नव्हे तर देशाच्या संपूर्ण जडणघडणीत कृषी, सहकार, उद्योग, क्रीडा, महिला धोरण अशा अनेक क्षेत्रांत अनमोल योगदान दिले आहे. पवार साहेबांबद्दल असं बोलण्याची आपली लायकी आहे का? अशा शब्दात सौ. वैशाली आभाळे यांनी अभिनेत्री केतकी चितळेचा समाचार घेतला आहे.
आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या आदर्श विचारांवर चालणारा महाराष्ट्र आहे. या विचारांनी माणसाला माणूस जोडण्याचे काम होत असून केतकी चितळेसारख्या विकृती मात्र माणसाला माणसापासून तोडणाऱ्या विखारी प्रवृत्ती आहेत. अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचणे गरजेचे असून पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतले आहे त्यामुळे तिच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सौ. आभाळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *