के.जे.सोमय्या महाविद्यालयात कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या तज्ञ संचालक पदी मा.संदीप रोहमारे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- “राजकारणापेक्षा शैक्षणिक, सामाजिक तसेच विधायक स्वरूपाचे सांस्कृतिक कार्य करीत राहणे ही रोहमारे परिवाराची पहिली पसंत आहे. राजकारणापासून नेहमीच दोन हात दूर राहणे आम्हाला आवडते. संदीप रोहमारे यांनी कोपरगाव शहर आणि परिसरात बिजनेस एक्सपो, डाळिंब परिषद त्याच बरोबर शेतकरी व शेतमजुरांसाठी अनेक विधायक उपक्रम राबविले आहेत, त्याची दखल घेऊनच त्यांची कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या तज्ञ संचालक पदी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार नेमणूक झाली आहे”, असे प्रतिपादन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांनी येथे केले. ते के. जे. सोमैया महाविद्यालयात संदीप रोहमारे यांच्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षपदावरुन बोलत होते.
मा. अशोकराव रोहमारे पुढे म्हणाले की “पीपल्स बँकेच्या गेल्या अनेक वर्षांचा इतिहासाचा मी साक्षीदार आहे. कोपरगाव व परिसरातील सर्व व्यापारी व उद्योजकांशी कै. के. बी. रोहमारे साहेबांचा ऋणानुबंध होता. संदीप रोहमारे यांच्या या सन्माननीय नेमणुकीमागे के.बी. साहेबांच्या सामाजिक कार्याचा वारसाही कारणीभूत आहे. आजही संदीप रोहमारेंना माझा हाच सल्ला आहे की त्यांनी सामाजिक बांधिलकी जपणार्‍या उद्योजक व व्यवसायिकांशी संबंध जोडून ते वृद्धिंगत करावेत. त्याचा त्यांना आपल्या भविष्यात नक्की उपयोग होईल.”
सत्काराला उत्तर देताना को.ता. एज्यु. सोसायटीचे विश्वस्त व कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि.चे नवनिर्वाचित तज्ञ संचालक संदीप रोहमारे म्हणाले की “आपण केलेला सत्कार हा घरचा सत्कार आहे त्यामुळे तो माझ्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे. शेतकरी व शेतमजुरांसाठी भरीव स्वरूपाचे कार्य करण्याची प्रेरणा मला माझे आजोबा कै के. बी. रोहमारे यांच्याकडून मिळाली आहे. त्याच बरोबर माझे तीर्थरूप अशोकराव रोहमारे यांचे संस्कार व मार्गदर्शन देखील मला सतत मिळत राहिले.त्याच बळावर मी कोपरगावात शेतकरी व शेतमजुरांसाठी डाळिंब परिषद आदी शेतीकेंद्रित उपक्रम राबविले. हे पद एक संधी मानून कोपरगाव परिसरातील गरीब तसेच गरजू शेतकरी व शेतमजुरांसाठी भविष्यात सार्थक काम करण्याची इच्छा आहे.”
याप्रसंगी प्राचार्य डॉ. यादव आपल्या मनोगतात म्हणाले की “संदीप भाऊ रोहमारे हे आमच्या संस्थेचे सर्वाधिक सक्रिय आणि अभ्यासू सदस्य आहेत. ते प्रत्येक गोष्टीचा आधी खोलवर जाऊन अभ्यास करतात व नंतरच कृती करतात. त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव तालुक्यातील गरजू आणि गरीब शेतकऱ्यांना नक्कीच भरीव आर्थिक मदत मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतो. त्यांना आमच्या उदंड शुभेच्छा.”
या सत्कार समारंभाचे प्रास्ताविक डॉ. के. एल. गिरमकर यांनी केले, तर आभार अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्षाचे प्रमुख डॉ विजय ठाणगे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. शैलेन्द्र बनसोडे यांनी केले. या समारंभाला कोपरगावातील प्रख्यात वास्तुविशारद राजेंद्र मुंजे तसेच महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *