स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एस. एस. जी. एम. महाविद्यालयाकडून कोपरगाव पंचायत समिती कार्यालयास ग्रंथभेट…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोपरगाव पंचायत समिती मार्फत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. आजादी का अमृत महोत्सव या मोहिमेचाच एक भाग म्हणून यावर्षी स्वातंत्र्यदिनी पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, तसेच विविध शासकीय कामांसाठी पंचायत समिती कार्यालयात येणारे लाभार्थी, शेतकरी, महिला भगिनी, पदाधिकारी यांच्यासाठी विविध विषयांवरील एक हजार ग्रंथांनी सुसज्ज असे ग्रंथालय उभारण्याचा संकल्प आहे. या प्रस्तावित ग्रंथालयासाठी कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज मधील ज्युनिअर व सिनिअर विभागातील प्राध्यापक तसेच कार्यालयीन कर्मचारी यांनी भेट म्हणून दिलेले ग्रंथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सानप व ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. रामभाऊ गमे, प्रा. बी. डी. पवार यांनी ५८ ग्रंथ पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी श्री. सचिन सूर्यवंशी यांचेकडे सुपूर्द केले. सामाजिक आणि वैचारिक बांधिलकीचा रयत शिक्षण संस्थेचा विचार समाजमनात रुजविण्याचे कार्य महाविद्यालय नेहमीच करीत असून वाचन चळवळ वृद्धींगत व्हावी ही उदात्त भावना या ग्रंथभेटीपाठीमागे असल्याची प्रतिक्रिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रमेश सानप यांनी व्यक्त केली.गट विकास अधिकारी मा. सचिन सूर्यवंशी यांनी ग्रंथदात्यांचे मनापासून आभार मानत विद्यार्थ्यांना अमृत महोत्सवी वर्षात जबाबदार नागरिक म्हणून पुढे येण्यासाठी वाचन संस्कृती विकसित करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. ग्रंथ संकलनाचे काम ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.रामभाऊ गमे व प्रसिद्धी विभाग प्रमुख डॉ. कैलास महाले यांनी केले. सदर प्रसंगी कोपरगाव तालुका वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. विकास घोलप, गोदावरी बचाव अभियानाचे प्रवर्तक मा. आदिनाथ ढाकणे, महाविद्यालयाच्या कला विभागाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. सुभाष रणधीर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. बाबासाहेब शेंडगे आदी मान्यवरांसह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *