
विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते कोपरगाव मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार…
कोपरगाव प्रतिनिधी:- आपला भारत देश महासत्ता करण्यासाठी सर्वप्रथम ग्रामीण भागात सुधारणा आवश्यक आहे. गावे स्वच्छ, समृद्ध आणि स्वयंपूर्ण केली पाहिजेत. योग्य नेतृत्व मिळाले तर समाजात सकारात्मक बदल घडतो. ग्रामपंचायत ही सार्वभौम संस्था असून, सरपंच हा सर्वात मोठा लोकप्रतिनिधी आहे. सरपंचांनी आपले अधिकार वापरताना योग्य आर्थिक नियोजन करून सेवावृत्तीने काम केले पाहिजे. माणसाला शंभर वर्षांचे आरोग्य मिळण्यासाठी स्वच्छ हवा, पाणी आणि चांगले अन्न मिळाले पाहिजे. गावात स्वच्छ पिण्याचे पाणी, भरपूर झाडे, मुलांसाठी शिक्षणाची सुविधा, स्वच्छता, आणि निराधार वयोवृद्धांना ग्रामपंचायतने आधार दिला तर प्रत्येक गाव आदर्श गाव होईल, असे मत औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव पाटोदाचे शिल्पकार तथा माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी व्यक्त केले.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा व निवडणुकीस सामोरे गेलेल्या उमेदवारांचा कोपरगाव तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आदर्श गाव पाटोदाचे माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी पेरे-पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक त्र्यंबकराव सरोदे होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते दत्तू नाना कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक बाळासाहेब वक्ते, मनेष गाडे, विलासराव वाबळे, निवृत्ती बनकर, ज्ञानेश्वर परजणे, बापूराव बारहाते, ज्ञानेश्वर होन, निलेश देवकर, बाळासाहेब पानगव्हाणे, अरुणकाका येवले, रमेश आभाळे, विलासराव माळी, सतीश आव्हाड, कैलास माळी, उषा संजय औताडे, मधुकरराव वक्ते, मोहनराव वाबळे, केशवराव भवर, नारायण अग्रवाल, बापूसाहेब सुराळकर, विलासराव आव्हाड, सतीश केकाण, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, माजी नगरसेवक अतुल काले, जनार्दन कदम, अशोक लकारे, दीपक जपे, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वैशालीताई आढाव, माजी नगरसेविका विद्याताई सोनवणे, शिल्पाताई रोहमारे आदींसह संजीवनी उद्योग समूहाशी संलग्न विविध संस्थांचे तसेच भाजप, भाजयुमो, ग्रा. पं. चे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी भास्करराव पेरे-पाटील व विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी तर सूत्रसंचालन माजी पं. स. सभापती शिवाजीराव वक्ते व संजीवनी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप नवले यांनी केले.

गावकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता गावचा सर्वांगीण विकास साधावा -विवेकभैय्या कोल्हे
युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघातील सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी गावकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता गावात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवाव्यात व गावचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आपला देश झपाट्याने प्रगती करत आहे. कोपरगाव तालुक्यातील विविध गावांतील पाणीपुरवठा योजनांसाठी पंतप्रधान मोदी यांनी ‘जलजीवन मिशन’ च्या माध्यमातून २७७ कोटीचा निधी दिला आहे. भारताला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करावा लागेल. गावाच्या विकासासाठी ठोस काम करायची इच्छा असेल तर काहीही अशक्य नाही. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात येसगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून सुरू झाली. अवघ्या २१ व्या वर्षी ते सरपंच झाले. नंतर सरपंच, आमदार, मंत्री असा त्यांचा राजकीय यशाचा आलेख सतत उंचावत गेला. त्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्यासह कोपरगाव तालुक्यात अनेक सहकारी संस्थांची उभारणी करून तालुक्यात विकासाची गंगा आणली. शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणली. आदर्श राजकारणी कसा असावा, याचे ते मूर्तिमंत उदाहरण होत. त्यांचा आदर्श जोपासत स्नेहलताताई कोल्हे यांनी आमदार झाल्यानंतर कोपरगाव तालुक्यात विकासाच्या अनेक योजना राबविल्या. तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आपण तहसील कार्यालयात तक्रार निवारण बैठक घेत असतो. त्यात सर्व सरपंचांनी आपापल्या गावातील समस्या मांडाव्यात. तालुक्यातील प्रलंबित प्रश्न शासनाकडे मांडून ते सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
स्व. शंकरराव कोल्हे यांचे कार्य खरोखर आदर्शवत -भास्करराव पेरे-पाटील
भास्करराव पेरे-पाटील यांनी आपल्या परखड व नर्मविनोदी शैलीतील भाषणात ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावाचा विकास कसा करावा, याविषयी सरपंच व ग्रा.पं. सदस्यांना चार युक्तीच्या गोष्टी सांगत बहुमोल मार्गदर्शन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबा तसेच माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्मरण करून ते म्हणाले, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी कृषी, सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून कोपरगाव तालुक्याला खऱ्या अर्थाने संजीवनी मिळवून दिली. त्यांनी शेतकऱ्यांमध्ये देव पहिला. सामान्य जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन आयुष्यभर लोकसेवा केली. तालुक्यात विकासाची गंगा आणली. ते खऱ्या अर्थाने विकासपुरुष असून, त्यांचे कार्य खरोखर आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार पेरे-पाटील यांनी काढले.

सरपंचांनी ‘या’ पंचसूत्रीवर काम केल्यास होईल गावचा विकास
सरपंचांनी आपल्या गावात स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवणे, भरपूर फळ झाडे लावणे, मुलांच्या शिक्षणाची सुविधा, निराधार वयोवृद्ध व्यक्तींना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करणे या पाच गोष्टींवर लक्ष देऊन व्यवस्थित काम केले तर गावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. गावातील प्रत्येक माणूस शंभर वर्षे जगला पाहिजे याचा विचार करून त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता केली पाहिजे. गावच्या विकासासाठी योग्य नियोजन हवे, नि:स्वार्थी भावनेने काम करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती हवी. प्रत्येक गावच्या सरपंचाने आपला गाव सुधारला तर आपला भारत देश नक्कीच सुधारेल. प्रथम कुटुंब, नंतर गाव आणि यातून भारत देश सुधारला की, तो निश्चितच महासत्ता होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पाटोदा गाव आदर्श कसे झाले?
पाटोदा गावात आपल्या २५ वर्षांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात कोणकोणत्या जनहिताच्या योजना राबविल्या व हे गाव कसे आदर्श बनवले याबाबत माहिती देताना पेरे-पाटील म्हणाले, १९९५ पासून पाटोदा या साडेतीन हजार लोकवस्तीच्या गावात मी काम सुरू केले. माझे शिक्षण सातवीपर्यंत झालेले आणि घरी वारकरी वातावरण होते. लोक आरोग्यपूर्ण आणि दीर्घायुष्य जगले पाहिजेत म्हणून मी प्रामाणिकपणे काम केले. आमच्या पाटोदा गावात अखंड २४ तास, ३६५ दिवस पाणीपुरवठा होतो. तेही शुद्ध पिण्याचे पाणी व सोलारमधून गरम पाणी. दररोजच्या घरगुती वापराच्या पाण्यासाठी गावात मीटर बसवले आहेत. महिलांना वर्षभर मोफत धान्य दळून देण्याची सोय केली आहे. स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा, मोठ्या प्रमाणात केलेले वृक्षारोपण, स्मशानभूमी, सायकल वाटप, सौरऊर्जा प्रकल्प, गाव भोजन, १०० टक्के वैयक्तिक स्वच्छतागृह, थुंकण्यासाठी केलेले वॉश बेसीन्स, कचऱ्याचे नियोजन, सीसीटीव्ही यंत्रणा, वायफाय सुविधा, बायोमेट्रिक हजेरी, डिजिटल शाळा, चार प्रकारचे पाणीपुरवठ्याचे नियोजन, कचरा व्यवस्थापन, सामुदायिक विवाह, वैयक्तिक वाढदिवस साजरा करणे, हागणदारीमुक्त व तंटामुक्त गाव, कपडे धुण्यासाठी धोबी घाट असे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आलेले आहेत. पाटोदा गाव सरकारी पैशातून नाही तर कर्ज काढून केवळ ९० दिवसांत हागणदारीमुक्त केले. गावातील प्रत्येक कुटुंबाकडून ग्रा. पं. ला दरवर्षी सरासरी ५ हजार रुपये कराचा भरणा होतो. दरवर्षी १ एप्रिलला ग्रामपंचायत कराचा शंभर टक्के भरणा होतो. ग्रा. पं. चे वार्षिक उत्पन्न ४० लाख तर खर्च ३२ लाख रुपये असून, ८ लाख रुपये नफा मिळतो. गावकऱ्यांनी भरलेल्या करातूनच ग्रा. पं. त्यांना सर्व प्रकारच्या दर्जेदार सुविधा पुरवते.


ग्रामविकासासाठी सरपंच व गावकरी यांच्यातील परस्पर संबंध महत्त्वाचे
भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, जगदगुरू तुकाराम महाराज, संत गाडगे बाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महापुरुषांनी जनजागृती करून समाजाला दिशा दिली, लोकहितासाठी मोठे काम केले. खेड्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल असे सर्वच महापुरुषांनी म्हटले आहे; पण त्यासाठी त्या गावातील लोकांची आणि गावाचे नेतृत्व करणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. सरपंचाने प्रामाणिकपणे काम करून गावकऱ्यांना विश्वासात घेत मूलभूत सेवा-सुविधा दिल्या पाहिजेत. गावच्या विकासासाठी कठोर निर्णय घेतले पाहिजेत. ग्रामविकासासाठी सरपंच व गावकरी यांच्यातील परस्पर संबंध महत्त्वाचे आहेत. नागरिकांना उत्तम सोयी-सुविधा मिळाल्या तर नागरिक कर द्यायला मागे राहत नाहीत हे आम्ही आमच्या पाटोदा गावी सिद्ध केले आहे, असे त्यांनी सांगितले.
गावात लोकसंख्येच्या बरोबरीने फळझाडे लावा
प्रदूषणामुळे माणसाचे जगण्याचे आयुष्य कमी होत चालले आहे. प्रत्येक गावात लोकसंख्येच्या बरोबरीने फळझाडे लावणे गरजेचे आहे. मूल जन्माला आले की, त्याला प्रथम आईच्या दुधाऐवजी ऑक्सिजन लागतो. झाडामुळे ऑक्सिजन मिळतो. झाडे म्हणजे पावसाचे ‘एटीएम’ आहे. प्रत्येक माणसामागे चार झाडे लावणे आवश्यक आहे. लग्नानंतर नवरीने माप ओलांडून येताना झाड लावले पाहिजे. झाड नाही तर लेकरं जगणार नाहीत हे सांगणे आवश्यक आहे. पाटोद्यात माणशी चार झाडे लावली आहेत. प्लास्टिकचा वापर कमी झाला पाहिजे. पूर्वजांना नावे ठेवू नका, त्यांच्या काळात ते योग्य होते. आपणच मोडतोड करून समस्या वाढविल्या आहेत. लोकांना शंभर वर्षांचे आरोग्य मिळण्यासाठी स्वच्छ हवा, पाणी आणि चांगले अन्न मिळाले पाहिजे. प्रत्येक गावात विकासाच्या आड येणाऱ्या प्रवृत्ती असतात. त्यामध्ये निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार आघाडीवर असतात. अशा प्रवृत्ती दुर्लक्षित करूनच विकास साधला पाहिजे. जो बदल समाजात घडावा असे आपल्याला वाटते तो बदल आधी स्वत:त घडवा. त्या बदलाचे काय फायदे होतात ते समाजाला दिसू द्या, समाज आपोआप तुमच्या मागे येईल. समाज ऐकतो, असा माझा अनुभव आहे. सांगणारा योग्य दर्जाचा आणि प्रामाणिक पाहिजे, असे पेरे-पाटील म्हणाले.
यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप उमेदवारांचा तसेच कोपरगाव तालुका ग्रामोद्योग सहकारी संस्थेच्या व जेऊर कुंभारी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचाही सत्कार करण्यात आला. नगर जिल्ह्यातील सर्वात तरुण ग्रा.पं.सदस्या बहादरपूरच्या आरती पाचोरे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. शेवटी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी केले.
