छत्रपती मुळेच मंदिरावर कळस आणि अंगणात तुळस राहिली:- महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्या अंगणात तुळस व आपल्या गावातील मंदिरावर कळस शाबूत राहिले असे प्रतिपादन राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौंनगिरीजी महाराज यांचे महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी बोलकी येथे आयोजित सत्संग व बाबाजींच्या पादुकांच्या चांदीचा रथ मिरवणूक प्रसंगी आपल्या प्रवचनातून केली.
जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या कृपाशीर्वादाने व महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रेरणेने सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री संत एकनाथ महाराज षष्ठी दिंडी सोहळ्याचे मार्गक्रमण तालुक्यातील बोलकी येथून होत असताना जय बाबाजी भक्त परिवार यांच्या वतीने शनिवार दि २० मार्च रोजी बोलकी येथे बाबाजींच्या पादुका असलेल्या चांदीच्या रथाची मिरवणूक सत्संग सोहळ्याचे व सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले की, या भूमीवर अनेक महान संत जन्माला आले व त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी काही ना काही योगदान दिले यात संत तुकाराम महाराजांनी गाथा, संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी, तर आपण जगावे कसे हे सांगणारे भागवत नाथ महाराजांनी दिले तसेच जगद्गुरु जनार्दन स्वामींची मूर्ती या जगात अमर असून बाबाजींचे कार्य देखील तितकेच अजरामर असून त्यांनी आपल्या उद्धारासाठी विधी,अनुष्ठान,श्रमदान अशा अनेक गोष्टी दिल्या असून या सर्व गोष्टींचे अनुकरण आपण सर्वांनी करावे ज्यामुळे आपोआपच आपले संपूर्ण जीवन सुखी होईल.
त्यासोबतच आपल्या गावाचा विकास व भरभराट व्हावी अस प्रत्येकाला वाटत असेल तर प्रत्येकाने आपापले मतभेद बाजूला ठेवत गाव स्वच्छ कसा होईल यासाठी सर्वांनी एकत्र येत बाबाजी ने सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे आपापल्या गावातील मंदिरे, विविध धार्मिक स्थळ, अमरधाम, आदी गावातील महत्वाची सार्वजनिक ठिकाणच्या परिसरात श्रमदान करत तो परिसर स्वच्छ करणे तसेच मनातील वाईट विचार-अपप्रवृत्ती झटकून टाकण्यासाठी गावोगावी चांगल्या विचारांचे सत्संग, आयोजित करणे आवश्यक आहे असा उपदेश शांतिगिरीजी महाराज यांनी उपस्थित भाविक भक्तांना आपल्या प्रवचनातून दिला.
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य केशव भवर, भाजपा तालुका अध्यक्ष साहेबराव रोहोम, माजी संचालक विश्वास महाले, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, युवा सेना प्रमुख चंद्रकांत भिंगारे आदिंसह मोठ्या प्रमाणात तालुक्यातील भाविक भक्त महिला पुरुष उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जय बाबाजी भक्त परिवार तालुका अध्यक्ष मुरली मोरे, बाबासाहेब वाघ, साईनाथ कवडे, प्रवीण कापसे, राजेंद्र निर्मळ, निलेश कापसे, राजेंद्र चरमळ आदींसह तालुक्यातील भाविक भक्तांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *