साईभक्तांसाठी खुशखबर रामनवमी उत्सव होणार पारंपारिक पद्धतीने साजरा देशभरातून येणाऱ्या साईभक्तांना साईपालखी आणण्यास परवानगी:- अध्यक्ष ना. आशुतोष काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी प्रतिनिधी :- मागील दोन वर्षापासून जीवघेण्या कोरोनाच्या सावटामुळे सर्व धार्मिक सण, उत्सव साजरे करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे मागील दोन वर्षापासून शिर्डीमध्ये होणारा पारंपारिक रामनवमी उत्सव देखील साईभक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला नव्हता. मात्र कोरोनाची तिसरी लाट संपुष्टात येत असून शासनाच्या वतीने देखील सर्वच निर्बंध शिथिल करण्याचे सुतोवाच दिले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत यावर्षीचा रामनवमी उत्सव साईभक्तांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने साजरा करून देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना साई पालखी येवून देण्यास देखील परवानगी देण्यात आली असल्याचा निर्णय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने वर्षभर असंख्य साईभक्तांच्या उपस्थितीत विविध सण उत्सव साजरे केले जातात. यामध्ये रामनवमी उत्सव, गुरु पौर्णिमा उत्सव, श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सव आदी उत्सव धार्मिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात. मात्र दोन वर्षापासून संपूर्ण विश्वावर आलेल्या जीवघेण्या महामारीमुळे हे उत्सव धार्मिक पद्धतीने साध्या स्वरूपात साजरे करण्यात आले. यावेळी कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका असल्यामुळे साईभक्तांना उपस्थितीत राहण्याची मुभा नसल्यामुळे लाखो साईभक्तांचा हिरमोड झाला होता. त्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा रामनवमी उत्सव साजरा करण्याबाबत विश्वस्त मंडळाची बैठक नुकतीच विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी उपाध्यक्ष जगदीश सावंत, विश्वस्त मा.आ. जयवंतराव जाधव, डॉ.एकनाथ गोंदकर, सुरेश वाबळे, महेंद्र शेळके, अॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.भाग्यश्री बाणायत आदी मान्यवर उपस्थित होते. ९ एप्रिल ते ११ एप्रिल या तीन दिवस साजरा करण्यात येणारा रामनवमी उत्सव हा साईभक्तांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने साजरा केला जावा. तसेच मागील दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे साईभक्तांना रामनवमी उत्सवात साई पालखी आणण्यास परवानगी नव्हती. कोरोणाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. त्यामुळे दरवर्षी रामनवमीला देशभरातून लाखो साईभक्त साईपालखी घेवून येत असतात त्यांना यावर्षी साईपालखी घेवून येण्यास देखील परवानगी देणेबाबत एकमताने मंजुरी देण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला असल्याची माहिती ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे. यावेळी स्व. लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली ठराव घेण्यात आला. व रामनवमी साजरा करणे बरोबरच इतर विषयांवर देखील विश्वस्त मंडळाने सविस्तर चर्चा केली.
चौकट :- साईभक्तांसाठी हि अतिशय आनंदाची बातमी असून विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे साईभक्तांनी स्वागत केले आहे. या निर्णयाचा फायदा शिर्डीतील असंख्य छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना होणार आहे. मागील दोन वर्षात श्री साईमंदिर भक्तांसाठी जरी उघडे करण्यात आले असले तरी कोरोना संकटामुळे काहीसे निर्बंध असल्यामुळे भक्तांची संख्या मर्यादित होती. मात्र विश्वस्त मंडळाने पारंपारिक पद्धतीने रामनवमीचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेवून साठी साईभक्तांना साईपालखी आणण्यास परवानगी दिल्यामुळे शिर्डी पुन्हा एकदा साईभक्तांच्या गर्दीने फुलून जाणार आहे. व येणाऱ्या लाखो साईभक्तांमुळे शिर्डीतील कोलमडलेली अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार असल्यामुळे शिर्डी ग्रामस्थांनी देखील विश्वस्त मंडळाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

फोटो ओळ:- रामनवमी उत्सव साजरा करणे तसेच विविध विषयावर ना. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त मंडळाची बैठक पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *