मध्य रेल्वे मार्गावरील अंडरपास मधून पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था निर्माण करा:- मंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव

मध्य रेल्वेच्या अव्यवहार्य अंडर पासमधून पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था निर्माण करण्याची मंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे मागणी..!!

कोपरगाव प्रतिनीधी
(नाशिक):-
मध्य रेल्वेच्या मनमाड दौंड व मनमाड – हैदराबाद रेल्वे मार्गावरील भुयारी
रस्त्यातील पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था निर्माण करण्यात यावी अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे केली. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे की, माझ्या येवला मतदारसंघातील मनमाड-दौंड रेल्वे मार्गावर पिंपळगाव जलाल व धामोडे येथे तर मनमाड-नांदेड-हैद्राबाद मार्गावर नगरसुल येथे रेल्वे फाटक होते. सदर रेल्वे फाटके काढून रेल्वेने या ठिकाणी अंडर पास मार्ग तयार केले आहेत. मात्र हे अंडर पास तयार करताना रेल्वेच्या तांत्रिक विभागाने त्याची व्यवहार्यता न पाहता अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांचे बांधकाम केले आहे. या भुयारी मार्गातून पाणी जाण्याची व्यवस्था नसल्यामुळे पावसाळ्यात या मार्गामध्ये तुडुंब पाणी भरलेले असते. त्यामुळे पावसाळ्यातील ४ ते ५ महीने पाण्यामुळे हे भुयारी मार्ग बंद होवून नागरीकांचे दळणवळण बंद होते. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होऊन त्यांना लांबच्या पर्यायी रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. येथील दळणवळण सुरळीत होण्यासाठी या भुयारी मार्गातून पाण्याचा निचरा करण्याची कायमस्वरुपी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या मागणी नुसार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *