गाण्याचा आत्मा परमेश्वराने हिरावला:- स्नेहलताताई कोल्हे, गानसम्राज्ञी लता मंगेशकरांची १३० कोटी भारतीयांच्या मनांतुन एक्झीट…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
एकशेतीस कोटी भारतीयांच्या मनातील भारतरत्न गानसम्राझी लता मंगेशकर यांच्या निधनाने गाण्याचा आत्मा परमेश्वराने हिरावला अशा शब्दात भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने श्रद्धांजली वाहिली. लता नावाच्या वादळ ९३ वर्षानंतर स्तब्ध झालं आहे. सुमारे ५० हजाराच्या वर त्यांनी गाणी गावून भारत देशाचं नांव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवलं.
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणांल्या की, भारतरत्न लता मंगेशकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षी बालकलाकार म्हणून भारतीय सिनेमात प्रवेश केला. त्यांच्या १३ व्या वर्षी वडीलांचे निधन झाले, त्यानंतर त्यांनी मागे वळून न पाहता मंगेशकर कुटुंबियांची ख्याती लोकप्रिय करण्यावर भर दिला. १९४२ पासून त्यांनी गाण्याच्या करीयरला सुरुवात केली. किती हसाल या मराठी चित्रपटात त्यांनी पहिलं गाणं गायलं, त्यानंतर मंगळागौर हे त्याचं दुसरं गाणं. महल चित्रपटातील आयेगा आनेवाला कल हया गाण्यानं १९४९ मध्ये त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. कवी प्रदीप यांनी लिहीलेलं आणि संगीतकार सी. रामचंद्र यांनी संगितबद्ध केलेलं ए मेरे वतन के लोगो हे गाणं सुपरहिट झालं. भारत चीन युद्धानंतर पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थीतीत त्यांनी हे गाणं गायलं होतं. त्यावेळी पंतप्रधान पंडीत नेहरू यांनाही हे गाणे ऐकून रडू आलं होतं. आज त्यांच्या जाण्यानं गायन क्षेत्रातील एक हरहुन्नरी आवाज स्तब्ध झाला आहे. लोकसभेत १९९९ ते २००५ याकाळात त्यांनी अनेक समाजउपयोगी कामे केली. पुणे येथे दिनानाथ मंगेशकर रुग्णालय उभारून त्यांनी शेकडो गोर-गरीब निराधारांवर मोफत उपचार करत कित्येकांना जीवनदान दिले. कोरोना काळात या रुग्णालयाच्या माध्यमांतून कित्येकजण मृत्युच्या वाटेवरून परत फिरले, त्यामुळे त्याचं जाणं अजुनही मनाला पटत नाही. भारतीय गाण्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यांत आशा-लता या जोडगोळीचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या निधनाने आपण सर्वच जण भारतरत्नाला पारखे झालो आहोत, त्यांचा आवाज भारतीय सिनेमात अजरामर राहिल असेही स्नेहलता कोल्हे शेवटी म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *