कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचे कृषी विभागाअंतर्गत असलेल्या शेततळे योजनेचे अनुदान रखडले असून हे अनुदान तातडीने शेतकऱ्यांना मिळावे अशा आशयाचे निवेदन आ.आशुतोष काळे यांनी कृषिमंत्री ना.दादा भुसे यांना दिले आहे.
शेतकऱ्यांना वेळेवर पिकांना पाणी देता यावे यासाठी शासनाकडून मागेल त्याला शेततळे योजना राबविली जात आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे.बहुतांशी शेतकऱ्यांना या योजनेचे अनुदान मिळालेले आहे.मात्र २०१९-२० या वर्षातील ६९ लाभार्थी आजही शेततळ्याच्या अनुदानापासून वंचित आहेत.ही अनुदानाची एकूण रक्कम रुपये ३३ लाख ७६ हजार एवढी आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांपुढे काहीशा आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे आजपर्यंत आलेल्या नैसर्गिक संकटाच्या वेळी झालेल्या नुकसानीची बहुतांश भरपाई दिली आहे. मात्र २०१९-२० या वर्षात वैश्विक कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्था अडचणीत आल्यामुळे शेततळ्याचे अनुदान रखडले आहे. परंतु आता परिस्थिती सुधारत असून अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची तयारी करतांना आर्थिक अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे एकूण परिस्थितीचा विचार करून शेततळे योजनेचे रखडलेले अनुदान तातडीने शेतकऱ्यांना मिळावे अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी कृषिमंत्री ना.दादा भुसे यांच्याकडे केली आहे. सदर मागणीला कृषीमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून लवकरात लवकर शेततळे योजनेचे रखडलेले अनुदान शेतकऱ्यांना देणार असल्याची ग्वाही दिली आहे अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

फोटो ओळ:- शेततळे योजनेचे रखडलेलेअनुदान तातडीने शेतकऱ्यांना मिळावे अशा आशयाचे निवेदन कृषिमंत्री ना.दादा भुसे यांना देतांना आ.आशुतोष काळे.
