पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत मिळालाच पाहिजे :- आ. आशुतोष काळे ; कोपरगाव तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या २०१ अर्जांना मंजुरी….
कोपरगाव प्रतिनिधी:– शासनाच्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावा यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी गुरुवारी कोपरगाव तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेचे ८१ व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे १२० असे एकूण २०१ अर्ज मंजूर करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, रक्ताटे मॅडम, नगरसेवक मंदार पहाडे, हाजीमेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, वाल्मिक लहिरे, संदिप कपिले, राहुल शिरसाठ, अरुण त्रिभुवन, प्रकाश रुईकर, माजी नगरसेवक फकीर कुरेशी, रमेश गवळी, दिनकर खरे, एकनाथ गंगुले, सिद्धार्थ शेळके आदी उपस्थित होते.
बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांची तत्काळ छाननी करून कोणताही पात्र नागरिक शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. प्रलंबित प्रकरणांचा नियमित आढावा घेऊन त्यांचा वेळेत निपटारा करावा तसेच लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे विना अडथळा उपलब्ध होतील यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे. गावपातळीवर जनजागृती करून पात्र नागरिकांना योजनांची माहिती उपलब्ध करून देण्याबरोबरच अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या समाजातील निराधार, दिव्यांग, विधवा, परित्यक्ता आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा आधार आहेत.पात्र लाभार्थ्यांना कोणताही विलंब न लावता योजनांचा लाभ मिळणे आवश्यक आहे. शासनाच्या प्रत्येक कल्याणकारी योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, हीच शासनाची भूमिका असून त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. नागरिकांनीही आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून या योजनांचा लाभ घ्यावा. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या समन्वयातून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो ओळ :- कोपरगाव तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा आढावा घेताना आमदार आशुतोष काळे,समवेत प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार महेश सावंत आदी.
