
कोपरगाव प्रतिनिधी : स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित दि. ७ ते १३ जानेवारी 2026 दरम्यान कुंभारी ता. कोपरगाव या ठिकाणी संपन्न झालेल्या विशेष श्रमसंस्कार शिबीराची सामाजिक जाणीवेची पायाभरणी करून सांगता झाली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये श्रम संस्कार रुजविणे तसेच ग्राम संस्कृतीचा विकास करणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबीराचे उद्घाटन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, मठाधिपती महंत श्री.श्री.१०८ राघवेश्वर नंदगिरीजी महाराज, विश्वस्त मा. संदिप रोहमारे, प्राचार्य प्रो. विजय ठाणगे, कोपरगाव पंचायत समितीचे क्षेत्रीय अधिकारी मा. ऋषिकेश बोरुडे, सहकार महर्षी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा. प्रशांत घुले, ग्रामपंचायत कुंभारी गावच्या सरपंच सौ. देवयानी प्रशांत घुले, उपसरपंच सौ. कविता ललित निलकंठ व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. उद्धाटकीय मनोगतात मठाधिपती महंत राघवेश्वर नंदगिरीजी महाराज यांनी श्रमसंस्काराचे महत्त्व नमुद करतानांच राष्ट्रनिर्मितीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या युवापिढीने नैतिकतेची कास पकडुन विकसनशिल देश घडविला पाहिजे असे म्हटले. अध्यक्षीय मनोगतात कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे यांनी दरवर्षी या श्रमसंस्कार शिबीराच्या माध्यमातून गाव पातळीवर होत असलेल्या कामाचे कौतुक करतांनाच कुंभारी गावाच्या सर्वांगिण विकासासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग सदैव कटिबध्द असल्याचे सांगितले. या गावाच्या भविष्यकालीन विकासासाठी नागरिकांच्या जनजागृतीची व सहकार्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या
श्रमसंस्कार शिबीर कालावधीत स्वयंसेवकांनी गावातील पडीक जमिनीचे व्यवस्थापन, जल संवर्धन, ग्रामस्वच्छता, गाव सुशोभीकरण, राघवेश्वर मंदिर परिसर स्वच्छता, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन या कामांबरोबरच गावाचा शाश्वत विकास व युवकांची भूमिका, शेंद्रीय शेती, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामस्वच्छता, आरोग्यम धनसंपदा, रक्तदान हेच जीवनदान, नदी प्रदूषण इत्यादी विषयावर जनजागृतीपरक पथनाट्यही तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यासमोर मुलींनी लाठीकाठी प्रदर्शन सादर केली. या कालावधीत दररोज दुपारी स्वयंसेवक व गावातील नागरिकांसाठी मुल्यशिक्षण, शाश्वत विकास व युवकांची भूमिका, व्यक्तिमत्व विकास, वाढती गुन्हेगारी व युवक, मृदा-जल व्यवस्थापन, व्यसनमुक्ती आदि विविध विषयांवर प्रबोधन सत्र आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेत मा. सुधीर डागा, मा.अॅड. मनोहर येवले, डॉ. बापूसाहेब भोसले, प्रा. अमोल चिने, श्री. गौरव पवार, श्री.सुशांत घोडके, तसेच ह.भ.प.भानुदास बैरागी यांची व्याख्याने झाली. या शिबिरामध्ये साईनाथ रक्तपेढी, शिर्डी यांचे वतीने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी मठाधिपती महंत राघवेश्वर नंदगिरीजी महाराज, कोपरगाव येथील आर.टी.ओ. असिस्टंट निकिता खंडिझोड, संस्थेचे विश्वस्त मा. संदिप रोहमारे, प्राचार्य प्रो. विजय ठाणगे, सहकार महर्षी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा. प्रशांत घुले, गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष मा. आदिनाथ ढाकणे, ग्रामपंचायत कुंभारी गावच्या सरपंच सौ. देवयानी प्रशांत घुले, उपसरपंच सौ. कविता ललित निलकंठ, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.आर.एम.दरेकर, गुरुवर्य तुकाराम बाबा हायस्कूलचे श्री.ए.एस.ताजने, श्री.डी.एन.बनकर व कुंभारी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. विजय ठाणगे यांनी स्वागत मनोगतात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने अशा श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातुन इतर गावात केलेल्या भरीव कामाची माहिती देतांनाच या स्वयंसेवकांनी केलेले काम इतर गावांसाठी दिशादर्शक ठरत असल्याचे सांगितले. कुंभारी गावातील नागरिकांचा विकसनशील दृष्टिकोण बघुन पुढील दोन वर्षासाठी कुंभारी हेच गाव शिबिरासाठी निवडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी मा. आदिनाथ ढाकणे, सरपंच सौ. देवयानीताई घुले यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या विशेष श्रमसंस्कार शिबीरात सहभागी होऊन उत्कृष्ट श्रमदान करणाऱ्या स्वयंसेवक व ग्रुपला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व इतिहास विभागाच्या सहकार्याने बनविण्यात आलेल्या प्राचीन राघवेश्वर मंदिर व कुंभारी गावच्या इतिहासाच्या माहिती फलकाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. कुंभारी गावच्या विकासासाठी सदैव तत्पर असलेले प्रथम लोकनियुक्त माजी सरपंच व सहकार महर्षी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मा. प्रशांत घुले यांनी गावात केलेल्या विकास कामाची तसेच वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा वसा हाती घेऊन त्यांच्या कल्पनेतुन गोदावरी नदीकाठी साकारत असलेल्या समृध्द वनराईची पाहणी उपस्थित मान्यवरांनी केली. या शिबिराच्या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे पदाधिकारी, जिल्हा समन्वयक, संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद व इतर मान्यवर, ग्रामस्थ यांनी भेटी देऊन स्वयंसेवक करत असलेल्या कामाचे कौतुक केले. या श्रमसंस्कार शिबीराच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.एस.गायकवाड, डॉ. संजय दवंगे, प्रा. रोहिणी घुगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
