कायरोप्रॅक्टिक उपचार व अ‍ॅक्युपंक्चर थेरपी’ ठरतेय गुणकारी :- अनिल राहणे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगावात प्रथमच हॉटेल वीरा पॅलेस येथे ‘नॅचरोपॅथी अँड अ‍ॅक्युपंक्चर सेंटर’ द्वारे ‘कायरोप्रॅक्टिक बोन सेटिंग, मर्म थेरपी, कपिंग थेरपी आणि अ‍ॅक्युपंक्चर थेरपी’ या विषयांवर पाच दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. नॅचरोथेरेपिस्ट सतीश जाधव आणि राहुल मैंद यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
या प्रसंगी मातोश्री गंगुबाई अ‍ॅक्युपंक्चर कॉलेज, अनदगड, अकोलाचे ट्रस्टी डॉ. अनिल रहाणे यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. हैदराबाद येथील प्रसिद्ध कायरोप्रॅक्टर डॉ. सौरभ सिंह यांनी प्रशिक्षक आणि व्याख्याता म्हणून मार्गदर्शन केले.
‘नॅचरोपॅथी अँड अ‍ॅक्युपंक्चर सेंटर’ च्या माध्यमातून अनेक डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच कोपरगावातील अनेक रुग्णांना औषधविरहित उपचार पद्धतींचा लाभ मिळाला. उपचारांमुळे आराम मिळाल्याने रुग्णांनी डॉ. सौरभ सिंह आणि नॅचरोपॅथी संचालकांचे आभार मानले.
याशिवाय, ‘नॅचरोपॅथी अँड अ‍ॅक्युपंक्चर सेंटर’, कोपरगाव या संस्थेला मातोश्री गंगुबाई अ‍ॅक्युपंक्चर कॉलेज अंतर्गत ‘CAE सेंटर’ (Clinical Acupuncture Education Centre) ची मान्यता मिळाली आहे.
प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना डॉ. अनिल रहाणे यांनी सांगितले की, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे पाठ, मान आणि सांधेदुखीच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. अशा वेदनांवर औषधांशिवाय आराम देणारी कायरोप्रॅक्टिक पद्धती आता जगभर लोकप्रिय होत आहे. ही कायरोप्रॅक्टिक उपचार कमी खर्चात उपलब्ध होऊ शकतात.
डॉ. सौरभ सिंह यांनी कायरोप्रॅक्टिक उपचारांबद्दल थोडक्यात माहिती दिली. ही पद्धत प्रथम १९ व्या शतकात अमेरिकेत डॅनियल डेव्हिड पाल्मर यांनी सुरू केली. यात मणक्याचे (spinal) मॅनिप्युलेशन, सांध्यांचे समायोजन आणि स्नायूंचे उपचार केले जातात. रुग्णाच्या शरीरावर हाताने ताण कमी करण्याच्या विशेष तंत्रांचा वापर होतो.
कायरोप्रॅक्टिक उपचारांमुळे पाठीच्या वेदना, डोकेदुखी आणि स्नायूंचा त्रास कमी होतो. शरीराची हालचाल सुधारते आणि रुग्णाला औषधांच्या दुष्परिणामांपासून बचाव होतो. काही संशोधनात ६० टक्क्यांहून अधिक रुग्णांना या उपचारांमुळे आराम झाल्याचे दिसते. आज बसून काम करण्याच्या सवयींमुळे पाठीच्या समस्या वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत कायरोप्रॅक्टिक उपचार सुरक्षित व प्रभावी पर्याय ठरू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *