
कोपरगाव प्रतिनिधी:-दि.महाराष्ट्र सारस्वताच्या निर्मितीमध्ये गोदाकाठाचे मोठे योगदान आहे.या गोदाकाठीच,कर्मवीरांची धारणा व प्रेरणा यांची जाणीव ठेवून तो वारसा चालविण्याचे कार्य रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय शंकरराव काळेसाहेब यांनी केले. सौ. सुशीलामाई काळे यांनी त्यांना भक्कम पाठिंबा आणि मोलाची साथ दिली. “माणसातील परमेश्वर शोधून त्याच्या विकासाचे राजकारण, समाजकारण आणि सांस्कृतिकीकरण करणारे आदर्श वस्तूपाठ म्हणून या अद्वैतांच्या कार्याकडे पाहिले पाहिजे” असे प्रतिपादन संगमनेर येथील महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात या महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. दिनानाथ पाटील यांनी केले.
येथील एस.एस.जी.एम कॉलेजमध्ये काळे कुटुंबीयांच्या सहकार्याने नुकतीच कै.सौ. सुशिलाबाई(माई)शंकरराव काळे स्मृती प्रित्यर्थ २२ वी ‘राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. दिनानाथ पाटील हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘गौतम एज्युकेशन सोसायटीचे व्हा. चेअरमन’ छबुराव आव्हाड हे होते.
संतांचा मानवतावाद आणि कर्मवीरांची वंचितांसाठीची तळमळ या पार्श्वभूमीवर कर्मवीरांनी वंचितांना जी शिक्षणाची व विकासाची संधी उपलब्ध करून दिली, ती नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात होईल की काय? अशी भीतीही याप्रसंगी डॉ. पाटील यांनी व्यक्त केली.
काळे कुटुंबीयांच्या वतीने दरवर्षी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहणारे कुटुंबाचे स्नेही प्रसिद्ध उद्योजक मा.सुनील जगताप यांचेही याप्रसंगी भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “वक्तृत्वाशिवाय जग चालू शकत नाही. वक्तृत्वामध्ये जग जिंकण्याची ताकद आहे. त्यासाठी त्यांनी हिटलर, प्रभाकरन ,विन्स्टर्न चर्चिल अशा अनेकांची उदाहरणे दिली. तसेच वक्तृत्वासाठी लागणारा आशय, प्रभावी प्रतिपादन, वेळेचे नियोजन, भाषा प्रभुत्व व अभ्यास या गुणांबद्दल सांगून विद्यार्थ्यांनी वक्तृत्व कला संपादन करावी, असे आवाहन केले.

महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.रमेश सानप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून ऑनलाईन स्वरुपात स्पर्धा घेण्यामागील भूमिका कथन केली, तसेच गेली २२ वर्ष स्पर्धेला मिळणारा भरघोस प्रतिसाद आणि सर्वांचे सहकार्य यामुळेच ही स्पर्धा यशस्वी होत असल्याचे सांगितले. पाहुण्यांचा परिचय डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी करून दिला. मान्यवरांचे आभार डॉ.अरविंद भागवत यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.छाया शिंदे,प्रा. सुशीला ठाणगे व सौ. डॉ. वैशाली सुपेकर यांनी केले. सदर कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
