कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पिकेल ते विकेल अभियान हाती घेतले आहे. कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे धोरण निश्चित करून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा उद्देश आहे. शेतकरी गट व फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांचा योग्य समन्वय साधल्यास शेतकऱ्याच्या मालाला शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या बाजारभावाची बाजारपेठ उपलब्ध होईल. पिकेल ते विकेल या अभियानातून शेतकरी व ग्राहक दोघांचा फायदा होवून शेतकरी आर्थिकदृष्ट्या प्रगत होण्यासाठी निश्चितपणे मदत होईल असा आशावाद आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.
कोपरगाव तहसील कार्यालय येथे पिकेल ते विकेल अभियान अंतर्गत तालुकास्तरीय समिती बैठक व तालुकास्तरीय शेतकरी समनव्य समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना आमदार आशुतोष काळे बोलत होते. यावेळी आत्माचे प्रकल्प उपसंचालक राजाराम गायकवाड यांनी संत सावता माळी रयत बाजार अभियानाचे सादरीकरण केले. यावेळी पुढे बोलतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, पिकेल ते विकेल या अभियानाचा उद्देश शेतकरी व ग्राहक यांच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. सरकारने याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार या अभियानाचे योग्य नियोजन करून कृषी विभागाने पिकेल ते विकेल या अभियानाचे आदर्शवत मॉडेल उभे करून शेतकरी व फार्मर प्रोड्युसर कंपन्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावे. शेतकऱ्यांनी ज्या पिकाला जास्त बाजारभाव मिळतो त्याच पिकाचे उत्पन्न न घेता इतरही पिके घेतली पाहिजे. यदाकदाचित सर्वच शेतकऱ्यांनी एकाच पिकाचे उत्पन्न घेतल्यास त्या पिकाला कमी बाजारभाव मिळून शेतकऱ्यांचे नुकसान होवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी इतरही पिकांचे उत्पादन घ्यावे. दुसऱ्या पिकाच्या उत्पादनातून शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघेल यासाठी शेतकऱ्यांनी सर्व प्रकारची पिके घेतली पाहिजे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी केले.
यावेळी आत्मा प्रकल्प उपसंचालक राजाराम गायकवाड, तहसीलदार योगेश चंद्रे, पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी दिलीप दहे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, कृषी अधिकारी पंडित वाघिरे, सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर, आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश आहेर, प्रगतिशील शेतकरी विजय जाधव, गणेश घाटे, दिलीप शिंदे, विठ्ठल जावळे, बाबासाहेब लांडगे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ – कोपरगाव तहसील कार्यालय येथे पिकेल ते विकेल अभियान अंतर्गत तालुकास्तरीय शेतकरी समनव्य समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना आमदार आशुतोष काळे समवेत तहसीलदार आत्मा प्रकल्प उपसंचालक राजाराम गायकवाड, तहसीलदार योगेश चंद्रे आदी.
