
कोपरगाव प्रतिनीधी:-
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी कुमार वेदांत संजय पाडेकर यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा येथे एम.बी.बी.एस. साठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य नारायण बारे यांनी दिली आहे. वेदांत हा चासनळी येथील कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी असून ध्येय, चिकाटी व अभ्यासाचे सातत्य या त्रिसूत्रीचा अभ्यास करून त्याने हे यश संपादन केले. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अशोकराव रोहमारे यांनी शुभेच्छा देताना ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे व हे विद्यार्थी ज्ञानाच्या प्रवाहात यावेत ही आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू’ असे गौरवोद्गार काढले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून स्थापन झालेल्या चासनळी येथील कनिष्ठ महाविद्यालयाने मागील काही वर्षापासून शैक्षणिक गुणवत्तेच्या बळावर नावलौकिक मिळविलेला असून वेदांतच्या या निवडीमुळे महाविद्यालयाच्या यशात निश्चितच भर पडली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे सहकार्य विद्यार्थ्यांना सतत होत असते. वेदांतने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव अॅड.संजीव कुलकर्णी, विश्वस्त चंद्रशेखर कुलकर्णी, संदीपराव रोहमारे, श्री.सुजित रोहमारे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी त्यांचे अभिनंदन केले. वेदांतच्या या निवडीबद्दल पंचक्रोशीतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
