समन्यायी पाणी वाटप कायदा रद्द करून तुमचेच पाप धुवा:- मनेश गाडे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
तीन दिवसांपूर्वी गोदावरी डावा कालवा फुटला असून लाखो लिटर पाणी वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.शेतीला वेळेवर रोटेशन नाही,कालव्याच्या दुरुस्तीसाठी कोटींच्या गप्पा झाल्या पण प्रत्यक्षात या सर्व हवेतल्या बाता कालवा फुटल्याने उघड पडल्या आहेत.कोपरगावचे आमदार काळे यांनी कायमच दोन वर्षे जनतेची दिशाभूल केल्याने त्यांना जे राहतात एका पक्षात पण त्यांचे सूत जुळलेले असते तिसऱ्या पक्षात अशा सोमनाथ चांदगुडे यांचा खांदा कोल्हेंवर टीका करायला वापरावा लागतो आहे हे काळे यांचे अपयश आहे अशी जहरी टीका सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे संचालक मनेश गाडे यांनी केली आहे.
कालवा दुरुस्तीसाठी ५५ कोटी मिळवले अशी प्रसिद्धी लाटणाऱ्या काळे यांनी दोन दिवसांपूर्वी कालवा फुटला व हे ५५ कोटी त्यातच मुरले की काय ? या वस्तूस्थिती पासून तोंड लपवण्यासाठीच आमदार काळे हे कोल्हेंवर टीका करण्यासाठी सोमनाथ चांदगुडे यांच्या सारख्या कायमच एका पक्षात राहून दुसऱ्या पक्षाला मदत करणाऱ्या नावाचा आधार घेत आहेत.चांदगुडे हे पदासाठी कायमच काळेंच्या इशाऱ्यावर चालत असल्याने त्यांचे भाजपमधून स्थान संपुष्टात आले.
सोमनाथ चांदगुडे यांनी पद्मकांत कुदळे यांच्या समवेत कालवा सल्लागार समितीच्या ढिसाळ धोरणाविरोधात भूमिका घेऊन काळे यांना घरचा आहेर देऊन अद्याप काही महिने देखील झाले नाहीत तोच त्यांना जणू काही सारे काही आलबेल असल्याचा साक्षात्कार झाला असा यु टर्न घेतला आहे.काळेंच्या विरोधात एक काळ गरळ ओकणाऱ्या चांदगुडे यांचे जुने दाखले दिले तर बरच काही चर्चेत येईल.सध्याच्या परिस्थितीत काही ना काही पद पदरात पाडून घेण्यासाठी चांदगुडे हे काळेंच्या तालावर पुन्हा थिरकू लागले आहेत अशा राजकीय अस्थिर नावाने कोल्हेंवर टीका करणे हेच मुळात हास्यास्पद आहे.
बातम्यांमधून काळे यांनी अर्धसत्य माहिती मांडण्याऐवजी समन्यायी पाणी वाटप कायद्याचा मसुदा झाला तेव्हा असलेल्या नियम अटी व त्यानंतर २००५ ला काळेंच्या कार्यकाळात कायदा संमत होतांना असलेल्या नियम अटी यात फार बदल होते याचा अभ्यास करावा व माजी आमदार काळे हे आमदार असतांना या कायद्याला संमत होतांना त्यांनी साधलेली सोयीस्कर चुप्पी हा प्रवासही सर्वांना माहीत आहे.हा कायदा संमत होण्यासाठी कोणाचे आतून संबंध राष्ट्रवादीशी होते हे सर्वश्रुत आहे.२००४ साली जेव्हा शिवसेनेने माजी आमदार अशोकराव काळे यांना संधी देऊन आमदारकी त्यांना मिळाली,त्याच वेळी त्यांनी शेतकरी व जनतेच्या हिताच्या आड येईल असा कायदा होऊ नये या साठी विरोध करायला हवा होता,मात्र त्यांना राष्ट्रवादीला विरोध करायचाच नव्हता हे स्पष्ट होते कारण भविष्यात त्यांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करायचा होता यासाठी त्यांनी समन्यायी पाणी वाटप कायद्याला मूक संमती दर्शवली.अर्थात आता त्या सर्व गोष्टींपेक्षा वर्तमान काळात ठोस भूमिका घ्यायची हिंमत काळेंनी दाखवावी.
केवळ नावाला विरोधी पक्षाचे आमदार असतांना माजी आमदार अशोकराव काळे यांचे राष्ट्रवादीशी असलेले सख्य लपून राहिलेले नव्हते.ते २००५ सालीच समन्यायी पाणी वाटप कायद्याला विरोध करू शकत होते मात्र त्यांनी सोयीस्कर मौन बाळगले.काळे यांचे मुळातच मन पक्ष बदलाचे होते म्हणूनच त्यांनी त्याच वेळी समन्यायी पाणीवाटप कायद्याला विरोध केला नाही.जर त्यांचा या कायद्याला प्रखर विरोध असता तर कायदा होऊन एवढी वर्षे झाली त्यावर त्यांनी आजवर काहीही ठोस पाऊल उचलले नाही.जशा हजारो नाममात्र दाखल केलेल्या याचिका असतात तशी स्वतःचा सहभाग उघडा होऊ नये म्हणून न्यायालयात याचिकेची नौटंकी केली जर समन्यायी पाणी वाटप कायद्याला विरोध करायचाच असता तर याचिका निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले असते.
विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी आगामी अधिवेशनात हा कायदा रद्द करण्याची प्रक्रिया करून घ्यावी कारण सरकार त्यांचे आहे,ते आता श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आहेत त्याचा वापर करून समन्यायी पाणी वाटप कायदा रद्द करून घ्यावा.मात्र ते असे काही करणार नाही कारण काळे यांना फक्त राजकारण ठाऊक आहे त्यामुळे ते केवळ जनतेला संभ्रमित करण्यात रस ठेवतात हे वारंवार उघड झाले आहे.मागे काय झाले हा इतिहास आपल्या सोयीने रंगवण्यात त्यांना आवड आहे मात्र वर्तमान काळात यावर कृती करण्याची त्यांची तयारी नाही.जनतेला संभ्रमित करून स्वतःचे अपयश झाकले जाणार नाही हे विद्यमान आमदार काळे यांनी विसरू नये आणि अर्धवट बातम्या पेरण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे टाळावे.स्वतःच्या वडिलांच्या काळात झालेल्या कोपरगावच्या मानगुटीवर बसलेल्या अन्यायकारक कायद्याला रद्द करण्याचे काम इतरांकडे बोट न दाखवता विद्यमान आमदारांनी करावे.
माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांचा कोपरगाव विकासात मोलाचा वाटा आहे.माजी मंत्री कोल्हे यांनी तालुक्याच्या पाणीप्रश्नासाठी केलेले आंदोलने,प्रयत्न,दिलेला लढा हा स्वतः स्वर्गीय काळे साहेब यांनीही कधी नाकारला नव्हता या उलट पाणी प्रश्नावर दोन्ही जेष्ठ नेत्यांनी राजकारण विरहित सकारात्मक भूमिका ठेवली होती,हे नव्या नेतृत्वाने विसरून बोलू नये.कोल्हे कुटूंबाचे भरीव काम तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठीच राहिले आहे.यासाठी खडा आंदोलन,रुम्हणे मोर्चा,वीज मीटर आंदोलन,पाट पाण्यासाठी लढा,पाणी प्रश्नावर स्व पक्षाशी संघर्ष असे कित्येक उदाहरणे देता येतील.आमदार काळे हे दोन वर्षांपासून सर्व प्रश्नांवर जनतेची दिशाभूल करत आहेर त्यामुळेच त्यांना कोल्हे कुटूंबावर टीका करण्यासाठी सोमनाथ चांदगुडे यांच्यासारख्याचा इतरांचा खांदा वापरावा लागत आहे असे खडेबोल गाडे यांनी सुनावले आहे.

चौकट – इतरांवर टिका करण्यासाठी काळे यांच्याकडे स्वतःच्या गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते काळेंच्या नजरेत राहिले नाहीत का ? म्हणून त्यांना इतर ऊसने नावे वापरून स्वतःचा बचाव करून घ्यावा लागत आहे का ? कालवा दुरुस्तिच्या गप्पा मारण्या ऐवजी रोटेशन वेळेवर दिले असते तर पिके मातीमोल झाली नसती ही वस्तुस्थिती विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी समजून घेऊन जबाबदारी स्विकारावी – मनेश गाडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *