के.जे.सोमय्या वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात गोदातरंग (२०२०-२१) चे लेफ्टनंट कर्नल नरेन दास यांच्या हस्ते प्रकाशन…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
“संस्कृती आणि सभ्यता आपल्या संस्कृतीचा भाग आहे. त्यावरच आपले अस्तित्व अवलंबून आहे. आपण आपल्या वसुंधरेची निरंतर उपासना केली पाहिजे. किंबहुना त्यामुळेच आपले अस्तित्व टिकून आहे. आपण आपला सांस्कृतिक वारसा जतन केला पाहिजे. त्याचे पोषण करायची सद्यस्थितीत अधिक गरज असल्याचे” प्रतिपादन 57 महाराष्ट्र बटालियन अहमदनगर चे प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल नरैन दास यांनी येथे केले. ते स्थानिक के.जे.सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ट महाविद्यालयाच्या गोदातरंग (२०२०-२१) वार्षिक अंकाच्या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ​ को. ता. एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे हे होते.
लेफ्टनंट कर्नल दास पुढे म्हणाले की “ज्या वसुंधरेवर आपण राहतो, त्या वसुंधरेचा वारसा आपण जपला पाहिजे. या वैश्विक उर्जेचे स्मरण ठेवून आपण त्याची उपासना केली पाहिजे. दररोज सकाळी केलेल्या या उपासनेमुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण होते. मनुष्याला आयुष्यात मुक्ती आणि यश तेव्हाच प्राप्त होते, जेव्हा तो त्याचे कर्तव्य तन-मन-धनापासून आणि एकाग्रतेने करतो. सध्याच्या कोविड महामारी काळात आपण खूपच अनिश्चित आणि वाईट अशा परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहोत. जिकडे-तिकडे चिंता, भिती आणि नैराश्याचे वातावरण आहे. परंतु तरीदेखील आपण प्राप्त झालेली माहिती प्रमाण न मानता आपल्या सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करून त्या माहितीचे आकलन करणे महत्त्वाचे आहे. केवळ अतिआत्मविश्वासातून संघर्षाचा आणि विनाशाचा जन्म होतो. याउलट आपण भीती आणि चिंतेचे जर संधीत रूपांतर केले तर आपला विजय निश्चित आहे. विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या ध्येयप्राप्तीतून मोठ्या ध्येयाकडे गेले पाहिजे तरच विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होतील” असेही ते म्हणाले. “विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखून कुठलीही कृती केली पाहिजे. असे केल्यास त्यांना यश हमखास मिळेल. कारगिल युद्धामध्ये लढणारे कॅप्टन विक्रम बत्रा आपल्या कुटुंबियांना म्हणाले होते की, “तिरंगा लहरा के आऊंगा या फिर लिटा के आऊंगा”, त्यांच्या या वक्तव्यातून हाच संदेश आपल्याला प्राप्त होतो.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना को. ता. एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे म्हणाले की, “गोदातरंग वार्षिकांक हा आमच्या महाविद्यालयात वर्षभर संपन्न होणाऱ्या शैक्षणिक आणि इतर घडामोडींचे प्रतिबिंब आहे. गेल्या वर्षीच्या गोदातरंग अंकामध्ये विद्यार्थ्यांनी कोविड महामारी संदर्भात आपले विचार, अनुभव, कविता, लेख निबंध इ. उत्कृष्ट वाड्मय-निर्मिती केलेली आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना आणि या अंकाचे उत्कृष्ट संपादन करणाऱ्या संपादक मंडळास मी धन्यवाद देतो. यापुढेही विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे या संधीचा लाभ घेऊन आपल्या प्रतिभेचा आविष्कार करावा अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त करतो.”
को.ता.एज्यु. सोसायटीचे सचिव ऍड. संजीव कुलकर्णी हे आपल्या विशेष मनोगतात म्हणाले की, “आपण पुस्तक घेतो परंतु वाचत नाही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील समृद्ध अशा ग्रंथालयातून विविध भाषेतील आणि विविध विषयावरील पुस्तके घ्यावीत ती मन लावून वाचावीत आणि त्यातून प्रेरणा घेऊन अंकासाठी लेखन करावे असे केल्यास विद्यार्थ्यांमधील प्रतिभा नक्कीच विकसित होईल असा विश्वास वाटतो.”
यानंतर प्रमुख अतिथी आणि इतर सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते गोदातरंग वार्षिक अंकाचे विधिवत प्रकाशन संपन्न झाले. प्रमुख अतिथी लेफ्टनंट कर्नल मा नरेन दास यांनी आपल्या भाषणात सुरुवातीला गोदातरंग वार्षिक अंकाच्या विधिवत प्रकाशनांची घोषणा देखील केली. त्याचबरोबर अंकासाठी लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी उपस्थित मान्यवरांचे महाविद्यालय व संस्थेच्या वतीने स्वागत करताना महाविद्यालयातील विविध उपक्रमांच्या तसेच विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी केलेल्या नेत्रदीपक कामगिरीचा आढावा घेतला. त्याचबरोबर गोदातरंग अंकासाठी लेखन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तसेच यापुढेही विद्यार्थ्यांनी गोदातरंगसाठी लेखन करून मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षाही व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना गोदातरंग वार्षिक अंकाचे प्रमुख संपादक डॉ. जिभाऊ मोरे यांनी हा गोदातरंग कोविड महामारी विशेषांकाच्या रूपात प्रकाशित करण्यात येत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर अंकाचे संपादन करण्यासाठी को. ता. एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव सर, कार्यालयीन अधीक्षक डॉ. अभिजीत नाईकवाडे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे तसेच श्री नवनाथ प्रेस पोहेगावचे संचालक श्री नवनाथ सोनवणे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांनी संपादक मंडळातील सहकाऱ्यांप्रति ऋण व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इंग्रजी विभागाच्या संपादक प्रा. वर्षा आहेर यांनी केले. तर इंग्रजी विभागाचे डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला को. ता. एज्यु. सोसायटीचे सदस्य मा. संदीपजी रोहमारे, मा. सुजितभाऊ रोहमारे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संतोष पगारे, आय. क्यू. ए. सी प्रमुख प्रा. व्ही. सी. ठाणगे, कला शाखा प्रमुख डॉ. के. एल. गिरमकर आदी प्राध्यापक वृंद तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच बरोबर एन. सी. सी छात्र तसेच एन. सी. सी. चे छात्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ :- गोदातरंग (२०२०-२१) चे प्रकाशन करताना डावीकडून संपादक डॉ.जे. एस. मोरे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, ले.कर्नल नरेन दास, मा. अशोकराव रोहमारे, ऍड. संजीवदादा कुलकर्णी व सुभेदार पदमसिंग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *