
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना आपत्ती सुरू झाल्यापासून कोपरगाव बाजार समितीचा जनावरांचा व शेळी मेंढी बाजार बंद आहे, त्यामुळे शेतकरी वर्गासह त्यावर अवलंबून असलेल्या अन्य वर्गाचे अतोनात हाल होत आहे, तेव्हा कोरोना नियम पाळून जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द् भोसले व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सौ स्नेहलता कोल्हे यांनी पुढे म्हणाले की, कोपरगाव बाजार समिती आवारात आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध असून जनावरांची खरेदी विक्री बंद असल्यामुळे शेतकरी वर्गासह अन्य व्यापारी यांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या खरीप शेतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा परिसर मोठा असून८९ गाव कार्यक्षेत्रातील संबंधितांचा दैनंदिन व्यवहार कोपरगाव बाजार समितीशी निगडीत आहे. सोमवार आठवडे बाजाराचा दिवस असून आसपासच्या ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात शेळी मेंढी पालन करून त्यावर चरितार्थ चालवणाऱ्या घटकांची संख्या व त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्याही मोठी आहे, पण कोरोनामुळे जनावरांचा बाजार बंद असल्याने त्याचा अर्थकारणावर विपरीत परिणाम होत आहे. जनावरांची खरेदी-विक्री व्यवहार बंद असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसू लागला आहे. कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या सर्व उपाययोजना करून जनावरांचा बाजार सुरू व्हावा म्हणून प्रशासनाकडे मागणी केलेली आहे. राज्यातील अन्य बाजार समिती कार्यक्षेत्रात बहुतांश ठिकाणी जनावरांचे बाजार सुरू झालेले आहेत. तेव्हा यावर तातडीने आदेश काढून कोपरगाव बाजार समितीत जनावरे व शेळी मेंढी बाजार सुरु करावा असे सौ स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या निवेदनात शेवटी म्हटले आहे.
