संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी पटवुन दिले ‘जलसंधारण आणि पाण्याच्या शाश्वत वापरा’ चे महत्व..!!
कोपरगांव प्रतिनिधी:- युनायटेड स्कूल्स आर्गनायझेशन ऑफ इंडिया (युएसओ), नवी दिल्ली या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने युनेस्कोच्या सहकार्याने राष्ट्रीय पातळीवर आयोजीत केलेल्या ‘एचटूओ वाटरवाईज प्रोग्राम फाॅर चिल्ड्रन ऑफ इंडिया’ या जलसंधारण आणि पाण्याचा शाश्वत वापर या संकल्पनेशी निगडीत स्पर्धेत संजीवनी अकॅडमीच्या चार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवुन नेत्र दिपक यश संपादन केले. यापुर्वीही संजीवनी अकॅडमीने राष्ट्रीय पातळीवर अनेक किर्तीमान प्रस्थापित केले असुन अलिकडच्या या यशाने संजीवनी अकॅडमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, अशी माहिती संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
सौ. कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की ‘एचटूओ वाटरवाईज प्रोग्राम फाॅर चिल्ड्रन ऑफ इंडिया’ ही स्पर्धा ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना भारतातील वाढत्या पाण्याच्या संकटाच्या संदर्भात कथा कल्पना आणि व्यंगचित्रे युएसओच्या संकेतस्थळावर पाठवायची होती. या स्पर्धे पाठीमागील युएसओचा हेतु विद्यार्थ्यांमधील सर्जनशिलता वाढवुन जलसंधारण शाश्वत पाण्याच्या वापरासंबंधी जागरूकता वाढविणे असा आहे. या स्पर्धेत आपल्या ज्ञानाच्या जोरावर, कल्पकतेने, सध्या भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नाचा अभ्यास करून संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना, व्यंगचित्रे पाठवुन अंतिम फेरीत ऑनलाईन पध्दतीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरेही दिली. यात इ.७ वी च्या सिध्दी संजय जोर्वेकर, अर्णव नितिन रोहमारे व इ. ५ वी च्या सुयोग गजानन चौधरी , ईश्वरी सतिश इंगळे यांनी नेत्रदिपक यश संपादन केले.
मुळात युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल आर्गनायझेशन (युनेस्को) ही स्थिरता आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी युनायटेड नेशन्सची १९४८ साली स्थापन झालेली संस्था आहे. या संस्थेचे कार्य दक्षिण आणि मध्य आशियायी मधिल ११ देशात चालते. यात भारताचाही समावेश आहे. या संस्थेच्या सहकार्याने युएसओ मार्फत भारतात कार्य केल्या जाते. युएसओ ने घेतलेल्या स्पर्धेेत देशातील ४३ शाळांमधील १७००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यात संजीवनी अकॅडमीच्या चार विद्यार्थ्यांची यश संपादित करीत संजीवनी अकॅडमीला राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा नेले, असे सौ. कोल्हे पत्रकात शेवटी म्हणाल्या.
माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीनराव कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तर सौ. मनाली कोल्हे यांनी छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी प्राचार्या सौ. सुंदरी सुब्रमण्यम, हेड मिस्ट्रेस माला मोरे, उपप्राचार्य विलास बागडे, मार्गदर्शक बालाराम साहु, स्कूल कॅप्टन आदिती बानेश गायकवाड व माणसी विजय नरोडे उपस्थित होते.

फोटो ओळीः- संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ. मनाली कोल्हे यांनी युएसओ, नवी दिल्ली आयोजीत ‘एचटूओ वाटरवाईज प्रोग्राम फाॅर चिल्ड्रन ऑफ इंडिया’ स्पर्धेत यश मिळविलेल्या संजीवनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
