बेलवंडी महाविद्यालय गुणवत्तेच्या बाबतीत आघाडीवर..!
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- स्पर्धेच्या युगात आज प्रत्येकाला पुढे जायचे आहे मात्र धावपळीच्या जीवनात पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. अशा परिस्थितीत शाळा-महाविद्यालयांच्या जबाबदाऱ्या निश्चितपणे वाढल्या आहेत. विद्यार्थ्यांना भौतिक सोयी सुविधांबरोबरच योग्य शिक्षण व योग्य संस्कार मिळणे गरजेचे असून शाळा-महाविद्यालयांच्या इमारती बरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील अत्यंत महत्वाची असल्याचे प्रतिपादन करून बेलवंडी महाविद्यालय गुणवत्तेच्या बाबतीत आघाडीवर असल्याचे रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कला व विज्ञान कनिष्ट महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार होते.
ते म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेच्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात नगर जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. स्व.-गंगाराम (आबा) शेलार यांनी या शाळेसाठी दिलेल्या योगदानातून हे महाविद्यालय उभे राहिले आहे. या शाळेसाठी शेलार कुटुंबियांचा मोठा त्याग आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारी रयत शिक्षण संस्थेची गुणवत्तापूर्ण शाखा म्हणून बेलवंडीच्या विद्यालयाकडे पाहिले जाते याचा अभिमान वाटतो. विद्यालयास नुकतेच गुणवत्तेचे ISO 9001-2015 मानांकन मिळाले हि भूषणावह बाब असून विद्यालयाने यापुढे देखील आपली गुणवत्ता अशीच टिकवून ठेवून प्रगतीचा आलेख उंचावत ठेवावा. बेलवंडीच्या महाविद्यालयाचा संस्थेच्या इतर महाविद्यालयांनी आदर्श घ्यावा असे आवाहन केले. बेलवंडी शाळेच्या इमारती बरोबरच रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागात ज्या शाळा-महाविद्यालयांच्या इमारतींचे काम करणे आवश्यक आहे त्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आजवर ज्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहे त्या सुविधा यापुढेही उपलब्ध करून दिल्या जातील. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना गुरु मानून माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी स्वत:ला रयत शिक्षण संस्थेला वाहून घेतलं होत. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून शाळा-महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना भौतिक सोयी सुविधांबरोबरच योग्य शिक्षण व योग्य संस्कार देवून देशाची उज्वल पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करून आदरणीय पवार साहेबांनी दिलेली जबाबदरी यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, सहसचिव संजय नागपुरे, विभागीय अधिकारी तुकाराम कण्हेरकर, जनरल बॉडी सदस्य सुभाष गांधी, कुंडलिकराव दरेकर, आर्किटेक्ट अनिल साळुंके, रामचंद्र नलगे, प्राचार्य संपतराव पवार, गोपीचंद इथापे, जयसिंग लबडे, दिनेश इथापे, सुभाष काळाणे, उत्तमराव डाके, सोपानराव हिरवे, युवराज पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकट :- रयत शिक्षण संस्थेचे आजचे वैभव माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्यामुळेच आहे. कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या नंतरही काळे परिवाराकडून रयत शिक्षण संस्थेला कोणतीही उणीव भासू दिली नाही. आ. आशुतोष काळे यांच्या रूपाने काळे परिवाराच्या तिसऱ्या पिढीकडे आलेली रयत शिक्षण संस्थेची जबाबदारी आ. आशुतोष काळे समर्थपणे पार पाडीत आहे याचा अभिमान वाटतो.-
बाबासाहेब भोस, मा.अध्यक्ष जिल्हा परिषद

फोटो ओळ:-
बेलवंडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ट महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी बोलतांना आ. आशुतोष काळे.
