
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- सत्ता असतांना सत्तेच्या धुंदीत कोपरगाव शहराचा विकास होवू दिला नाही व आत्ता सत्ता नसतांना सत्ता गेल्याच्या रोषातून कोपरगाव शहराचा विकास होवू द्यायचा नाही या माजी आमदार कोल्हे यांच्या धोरणामुळे कोपरगाव शहर विकासाच्या बाबतीत मागील पाच वर्षात खूपच मागे गेले असून कोपरगावच्या अधोगतीला मा. आ. कोल्हेच कारणीभूत असल्याची टीका मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड यांनी केली आहे.
शहरातील जनतेने कोल्हेंना कोपरगाव नगरपरिषदेत अनेकवेळा सत्ता दिली मात्र त्यांच्याकडून विकास कामे करण्यापेक्षा विकास कामांना विरोध करून विकासाच्या बाबतीत शहर भकास करण्याचे काम झाले आहे. शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. मुख्य रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. त्याचा परिणाम शहरातील छोट्या-मोठ्या उदयोग व्यवसायांवर होत असून उद्योग-व्यवसायांना उतरती कळा लागली आहे. कोपरगाव शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी साठवण क्षमता वाढविणे महत्वाचे असून त्यासाठी पाच नंबर तलाव होणे गरजेचे होते. मागील पाच वर्षाच्या काळात राज्यात व केंद्रात त्यांच्या पक्षाचे सरकार होते. कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी विद्यमान मुख्यमंत्र्यांना आणून त्यांच्या तोंडून अनेक बढाया मारून घेतल्या. मात्र नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांचा उमेदवार शहरातील जनतेने नाकारल्यामुळे शहरातील जनतेप्रती त्यांच्या मनात आकस निर्माण झाला होता. त्या आकसापोटी त्यांच्या कार्यकाळात सत्तेचा दुरुपयोग करून शहराच्या विकासाचा निधी इतरत्र वळवून त्यांनी शहरातील जनतेकडून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील वचपा काढला. पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण झाल्यास शहरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल त्याचे श्रेय या तलावासाठी पोटतिडकीने लढणाऱ्या आ.आशुतोष काळे यांना मिळेल त्याचे श्रेय आपल्याला मिळणार नाही या भीतीपोटी सत्तेचा वापर करून त्यांच्या कार्यकाळात मा. आ. कोल्हेंनी पाच नंबर साठवण तलावाचे काम होवू दिले नाही. हे कोपरगाव शहरातील सुज्ञ जनता उघड्या डोळ्यांनी पाहून सहन करीत होती. मात्र याच सुज्ञ जनतेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हेंना कायमचे घरी बसविल्यामुळे मा. आ. कोल्हेंचा अजूनच तिळपापड झाला. तेव्हापासुन मा.आ.कोल्हेच्या शहरातील नागरिकांविषयी असलेल्या द्वेषात अजूनच भर पडली होती. शहरातील मुख्य रस्त्याच्या सुरु झालेल्या कामाला हायकोर्टातून स्थगिती मिळवून त्यांनी डाव साधला असून कोपरगाव शहराच्या अधोगतीला मा.आ.कोल्हेच कारणीभूत आहे असे गायकवाड यांनी म्हटले आहे.
