सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कृषी विद्यापीठातील विविध प्रकल्पांना भेटी…


(राहुरी विद्यापीठ)
कोपरगाव प्रतिनिधी:-
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा संकल्प अभियान विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सातारा आणि गोकाक सहकारी पाणी पुरवठा संस्था, मलकापूर, कराड यांच्या वतीने आयोजित राज्यांतर्गत शेतकरी अभ्यासदौऱ्यातील गोकाक सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे १०० सभासद शेतकरी व कृषि अधिकारी यांचा अभ्यास दौरा कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आला. यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष तथा गोकाक सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष श्री मनोहर शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यापीठातील विविध संशोधन प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील तंत्रज्ञान जाणून घेतले. यामध्ये सुरुवातीला कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रामध्ये जनसंपर्क अधिकारी डॉ. सचिन सदाफळ यांनी विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाला भेट दिल्यानंतर या भेटीदरम्यान विभाग प्रमुख डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जलसिंचन व निचरा विषयाचे अभियंता तथा शास्त्रज्ञ डॉ. देविदास खेडकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले तसेच अलीकडेच स्थापित करण्यात आलेली सौर ऊर्जेवर चालणारी सेंटर पिव्होट सिंचन प्रणाली यांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यावेळी सूक्ष्म सिंचनाचे विविध प्रकार प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांनी जाणून घेतले.
या प्रकल्पातील मृदाशास्त्रज्ञ डॉ. सुभाष घोडके यांनी मर्यादित पाण्याचा कार्यक्षम वापर करताना जमिनीचे आरोग्य कसे टिकवावे याबाबत मार्गदर्शन केले. मृद विज्ञान विभागाचे डॉ. आनंद जाधव यांनी माती व पाणी परीक्षणात संदर्भात माहिती दिली. तसेच रब्बी पिकांचे खत व्यवस्थापना संदर्भात शेतकऱ्यांबरोबर संवाद साधला. अखिल भारतीय समन्वित भाजीपाला सुधार प्रकल्पाच्या भेटीप्रसंगी उद्यानविद्या विभागाचे प्रमुख डॉ. भरत पाटील यांनी भाजीपाला पिकातील विविध प्रयोग तसेच तेथील संशोधन कार्याची माहिती दिली.
यानंतर सेंद्रिय शेती प्रकल्पातील भेटीमध्ये डॉ. उल्हास सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सेंद्रिय शेती प्रकल्पातील विविध प्रयोगांबाबत तेथील वरिष्ठ संशोधन सहयोगी श्री. विक्रम उगले यांनी माहिती दिली.
विद्यापीठातील विविध प्रकल्पांना भेट दिल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने गोकाक सहकारी पाणीपुरवठा संस्था लि., कराड, या संस्थेचे चेअरमन श्री. मनोहर भास्करराव शिंदे यांनी विद्यापीठात सुरू असलेले शेतकरीभिमुख संशोधनाचे कौतुक केले. या भेटीचे नियोजन डॉ. सचिन सदाफळ यांनी केले.
