Uncategorized

कोपरगाव बस आगारात आ. स्नेहलताताई कोल्हे यांची अचानक धाड, प्रवाशांच्या गैरसोयीवर अधिकाऱ्यांना खडसावले…

बससेवा, स्वच्छता, महिला सुरक्षा आणि मूलभूत सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना, मी पुन्हा येणार, तोपर्यंत सुधारणा झालेल्या दिसल्या पाहिजेत…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव आगारातील बससेवा, प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा, स्वच्छता आणि महिला सुरक्षेची पाहणी करण्यासाठी मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी अचानक आगाराला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अनेक बस नादुरुस्त असल्याने प्रवाशांना, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना रस्त्यातच त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी बस आगारातील अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

बसस्थानक परिसरातील अस्वच्छता, स्वच्छतागृहांमध्ये आवश्यक सुविधांचा अभाव तसेच प्रवाशांसाठीच्या मूलभूत सोयींची पाहणी करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना केल्या. हिरकणी कक्ष कुलूपबंद असल्याचे आढळून आले. तसेच बसस्थानकाच्या पूर्व बाजूस मैलमिश्रित पाणी मोठ्या प्रमाणात उघड्यावर वाहत असल्याचेही निदर्शनास आले. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बसस्थानक परिसरात टवाळखोरांकडून होणारा त्रास रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक ती कारवाई करून बंदोबस्त वाढवावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना बस खोळंब्यामुळे तासनतास गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याबद्दल आ. कोल्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बस दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्यास त्याबाबत वरिष्ठ स्तरावर तातडीने मागणी करावी. आवश्यक तेथे लोकप्रतिनिधी व माझ्याशी संपर्क साधा, आम्ही वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून मदत करू, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे असे निदर्शनास आणून दिले.

नागरिकांची गैरसोय होता कामा नये. प्रवासी, विद्यार्थी आणि महिला प्रवाशांना सुरक्षित व सन्मानजनक सुविधा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मी पुन्हा आगाराला भेट देणार असून, तोपर्यंत आज निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटींमध्ये सुधारणा झालेल्या दिसल्या पाहिजेत,असे आ. स्नेहलता कोल्हे यांनी स्पष्ट केले.बसस्थानक परिसरातील खड्डे तातडीने बुजवावेत, बंद असलेले स्ट्रीट लाईट सुरू करावेत, प्रवाशांसाठी पंख्यांची व्यवस्था सुरळीत ठेवावी, तसेच स्वच्छता व महिला सुविधांकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आरोग्य सभापती वैभव आढाव, महिला मोर्चा शहराध्यक्ष अनिता गाडे, अविनाश पाठक यांच्यासह कोपरगाव बस स्थानकातील प्रवासी नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *