Uncategorized

“कर्मवीरांनी स्वतःचे घर बांधण्यापेक्षा शिक्षणाचे मंदिर उभारण्याला प्राधान्य दिले” :- आ. रोहित पवार…

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३९ वा जयंती सोहळा संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी : “महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या महापुरुषांनाही त्यांच्या काळात मोठा संघर्ष करावा लागला. त्यांच्या संघर्षामुळेच आजची पिढी शिक्षणाच्या आणि प्रगतीच्या संधींचा लाभ घेत आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. संगणक शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोजगाराच्या बदलत्या संधी, संरक्षण क्षेत्र, रोबोटिक्स, व्यवस्थापन तसेच आपल्या-आपल्या क्षेत्रात होत असलेले तांत्रिक बदल यांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. प्रयत्न करून पाहा; संधी स्वतःहून निर्माण होत नाहीत, त्या प्रयत्नातून निर्माण कराव्या लागतात. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये आई-वडिलांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा असतो. तुमची स्वप्ने ही केवळ तुमची नसतात, तर त्यामध्ये तुमच्या आई-वडिलांचीही स्वप्ने आणि अपेक्षा जोडलेल्या असतात. त्यामुळे आपल्या ध्येयासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. मात्र, इतरांशी स्वतःची तुलना करणे टाळा. प्रत्येक व्यक्तीचा संघर्ष, परिस्थिती आणि प्रवास वेगळा असतो. पैशाच्या मोजपट्टीने नाती, भावना आणि माणुसकी मोजता येत नाही. त्या कृतीतून दिसतात. रयत शिक्षण संस्था ही केवळ एखादी संस्था नसून सर्वसामान्यांच्या शिक्षणाची आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. या संस्थेच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली आहे. त्यामुळे रयत ही तुमची, आमची आणि सर्वसामान्यांची संस्था आहे. तिच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे”. असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा आमदार मा. रोहित पवार यांनी केले. ते येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स,गौतम आर्ट्स अँण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय, पद्मा मेहता प्राथ. कन्या विद्यामंदिर डॉ. सी.एम.मेहता कन्या विद्यामंदिर, कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय कोपरगाव,या पाच शाखांच्या वतीने नुकताच १३९ वा कर्मवीर जयंती सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी ते बोलत होते.

कर्मवीर प्रतिमा पूजन आणि त्या नंतर सी.एम.मेहता कन्या विद्यामंदिर मधील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या रयतगीताने आरंभ झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. श्री. चंद्रकांत दळवी हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात, “हाती घेतलेल्या विविध महत्त्वाच्या उपक्रमांविषयी माहिती देताना रयतचे ब्रँडिंग होणे आवश्यक असल्याचे सांगून शैक्षणिक विकास आराखडा, AI प्रशिक्षण, माजी विद्यार्थी संघ आणि त्याचा विस्तार, रयत वेबसाईट, वर्गखोल्या, स्टाफरूम यांसारख्या अनेक बाबीं आणि अद्ययावतीकरण हाती घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कर्मवीर शंकरराव काळे यांनी संस्था विकासासाठी कोपरगाव ते सातारा प्रवास करून संस्थेसाठी मोठे योगदान दिल्याची आठवण करून दिली. याप्रमाणेच शंकरराव कोल्हे यांनीही ४५ वर्ष मॅनेजिंग कौन्सिल सदस्य पद सांभाळून रयतसाठी मोठे योगदान दिल्याचे सांगितले. यशवंतराव चव्हाण यांनी कर्मवीर अण्णांविषयी केलेल्या वक्तव्याची उजळणी करताना त्यांनी सांगितले की, कर्मवीर अण्णांसारख्या प्राचीन ऋषींनी उभारलेल्या शैक्षणिक संस्था हया आज त्यांची आधुनिक स्मारके आहेत. या स्मारकांचे, त्यांच्या विचार व कृतीद्वारे जतन, संवर्धन करणे ही विद्यार्थ्यांसह सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ए.आय. तंत्रज्ञानाचे महत्त्व जाणून घ्यावे व रयत उपलब्ध करून दिलेल्या एआय शिक्षणाच्या संधीचा लाभ घ्यावा.
महाविद्यालय विकास समितीचे सदस्य तथा विधान परिषदेचे सदस्य मा आम. विवेक कोल्हे म्हणाले की, “लक्ष्मीबाईंच्या अश्रूंपासून निर्माण झालेली रयत आज आशियातील सर्वांत मोठ्या शिक्षण संस्थांपैकी एक म्हणून उभी आहे. या शिक्षण संस्थेच्या उभारणीत काळे साहेब आणि कोल्हे साहेब यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

नव्या काळातील बदल स्वीकारून शिक्षण संस्था चालकांनी आधुनिक दृष्टिकोनातून काम करणे आवश्यक आहे. स्किल-बेस्ड एज्युकेशनला प्राधान्य देत विद्यार्थ्यांना केवळ पदवीधारक नव्हे, तर कौशल्यसंपन्न आणि रोजगारक्षम बनविणे गरजेचे आहे. देशाच्या जडणघडणीत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्याच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना सक्षम करण्याची गरज आहे.”, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य सदस्य विधानसभा मा. आ. श्री. आशुतोष काळे यांनी, “रयत शिक्षण संस्थेच्या १०७ वर्षांच्या वाटचालीतकर्मवीरांचा बहुजन समाजाला शिक्षण देण्याचा विचार केंद्रस्थानी राहिला आहे. या विचारानुरूप नुरूप ‘गाव ते जग’ असा बदल स्वीकारताना आधुनिकतेची कास धरणे आवश्यक आहे. ए.आय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना माहितीची सत्यता व विश्वासार्हता पडताळून पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट केले.
रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन आणि कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष ॲड. संदीप वर्पे यांनी, “ज्या काळात शिक्षणाचा अभाव आणि अस्पृश्यता होती, त्या काळात रयत शिक्षण संस्थेने गोरगरीब व वंचितांसाठी शिक्षणाची दारे खुली करून समाजाला साक्षर करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले”. असे सांगून महाविद्यालयातील विविध कौशल्यपूर्ण उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली.

रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन ॲड. श्री. भगीरथ शिंदे यांनी, अज्ञानात चाचपडत असलेल्या समाजाला दिशा देण्याचे कार्य कर्मवीरांनी केले. समाजातील साक्षरता वाढविण्याचे काम कर्मवीरामुळे शक्य झाले, आज बदलत्या काळानुसार शिक्षण संस्था बदलते आहे, याचाच परिपाक म्हणून मोठ्या प्रमाणात रयत शिक्षण संस्थेतून कृत्रिम बुद्धिमत्ता विषयाचे मोठ्या प्रमाणात शिक्षण दिले जात आहे. यात रयत सेवकांचे मोठे सहकार्य आणि योगदान आहे.” असे सांगून वर्षभरातील कामाचे सिंहावलोकन करण्याचा हा क्षण आहे, असे अभिमानाने सांगितले.
या सोहळ्यास पालघरचे माजी आ. श्री. सुनील भुसारा, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. श्री. सुरेश बोळीज, मा. श्री. किरण कडू, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. श्री. कारभारी आगवण, मा. श्री. पद्माकांत कुदळे, मा. श्री. बाळासाहेब कदम, मा. श्री. नानासाहेब देवकर, गटशिक्षणाधिकारी श्रीमती वाजे, मा. श्री. राजेश परजणे, महाविद्यालय विकास समितीचे मा. श्री. सुनील गंगुले, निमंत्रित सदस्य मा. श्री. महेंद्रकुमार काले, मा. श्री. बाळासाहेब आव्हाड, मा. श्री. ज्ञानेश्वर वाघचौरे, तसेच मा.श्री. पंकज बोरुडे, मा. श्री. दिलीप दारुणकर, डॉ. गोवर्धन हुसळे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

सदर कार्यक्रमाला पाचही शाखांचे शाखाप्रमुख प्राचार्य डॉ. माधव सरोदे, सौ. अनिता धनक, प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती संगीता दरेकर, मुख्याध्यापक श्री. गजानन जाधव, मुख्याध्यापक श्री. शिवाजी लंके, सोहळ्याचे समन्वयक डॉ. संतोष पवार उपप्राचार्य डॉ.बंडेराव तऱ्हाळ, उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, डॉ. घन:श्याम भगत, कार्यालय अधीक्षक श्री. सुनील गोसावी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले. मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक सौ. अनिता धनक यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रवींद्र हिंगे, डॉ. सुनिता अत्रे व सौ.ज्योती लामखडे यांनी केले.
सदर कार्यक्रमप्रसंगी पत्रकार, तालुक्यातील रयत शैक्षणिक संकुलातील मुख्याध्यापक, सर्व प्राध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पाचही शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *