Uncategorized

बसस्थानक चुकीचे बांधणाऱ्या शिल्पकार तुम्हीच; आता कशाला धाड घालता :- नगरसेविका सौ.निर्मला आढाव…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- ज्यावेळी शेजारच्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी त्यांच्या शहरात बसस्थानक बांधले त्या बसस्थानकात करण्यात आलेल्या सोयी-सुविधांप्रमाणे कोपरगावचे पण बसस्थानक होईल अशी बसने प्रवास करणाऱ्या लाखों प्रवाशांना व कोपरगावकरांना भाबडी अपेक्षा होती. मात्र आपण चुकीचे बसस्थानक बांधून ठेवल्यामुळे त्याप्रमाणे काही घडलेच नाही आणि कोपरगावकरांच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. त्यामुळे हे बसस्थानक चुकीचे बांधणाऱ्या शिल्पकार तुम्हीच आता कशाला धाड घालता; त्यावेळीच बसस्थानक धड बांधले असते तर धाड टाकायची वेळच आली नसती असा चिमटा नगरसेविका सौ.निर्मला आढाव यांनी माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांना काढला आहे.
कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बांधण्यात आलेले कोपरगाव बसस्थानकाचे चुकीचे नियोजन करून प्रवाशांच्या अडचणी वाढविण्याचे काम माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे. आता धाड मारून काहीच उपयोग नाही. त्यावेळी योग्य नियोजन केले असते तर आता धाड मारायची वेळ आली नसती. हा शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार असून केवळ फोटो सेशन आणि खोट्या प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे. या माध्यमातून प्रवाशांची आणि कोपरगावकरांची सहानुभूती मिळविण्याचा आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांचा केविलवाणा प्रयत्न असून खोटा कळवळा दाखविणे ही कोल्हे यांची जुनीच सवय असल्याचे नगरसेविका सौ.निर्मला आढाव यांनी म्हटले आहे.

ज्याप्रमाणे कोपरगाव शहरातील मोकळ्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी निधी आणला त्याप्रमाणे कोपरगाव बसस्थानका लगत व्यापारी संकुल उभारण्यासाठी निधी आणून व्यापारी संकुल उभारले आहे त्याचा फायदा कोपरगावकरांना होणार असून निश्चितपणे कित्येक व्यावसायिकांना व्यवसायाच्या संधी मिळणार आहे व कोपरगाव शहराची आर्थिक उलाढाल वाढणार आहे. त्याप्रमाणे आपण कोपरगाव शहराची बाजारपेठ फुलविण्यासाठी आपण बांधलेल्या या बसस्थानकाची भूमिका पण तेवढीच महत्वाची राहिली असती. बसस्थानकांच्या चहूबाजूंनी व्यापारी संकुल उभारून बसस्थानाकाला सुरक्षित कंपाऊंड पण मिळाले असते, कित्येक व्यावसायिकांना व्यवसाय करण्याच्या संधी मिळून कोपरगावची बाजारपेठ पण फुलली असती असे कित्येक उद्देश हे बसस्थानक योग्य पद्धतीने बांधले असते तर साध्य झाले असते.परंतु कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही,ज्यांच्याकडे विकासाच्या संकल्पना नाही, विकासाची दूरदृष्टि नाही नाही त्यांनी चुकीचे बसस्थानक बांधून ठेवले आणि आता धाड मारून स्वत:च्या चुकीवर कशाला पांघरून घालत आहेत असा टोला नगरसेविका सौ.निर्मला आढाव यांनी माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांना लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *