तालुकास्तरीय व्हालीबाॅलमध्ये संजीवनी सैनिकी स्कूल अव्वल, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाचे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखदार प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी :- तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १७ वर्षांखालील मुलांच्या व्हॉलीबॉल संघाने दमदार कामगिरी करत तालुकास्तरीय विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात संजीवनीच्या संघाने आत्मामलिक स्कूलच्या संघावर मात करत विजेतेपदावर नाव कोरले. या शानदार विजयामुळे संजीवनीच्या संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखदार प्रवेश केला आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय पुणे, अहिल्यानगर क्रीडा अधिकारी व तालुका क्रीडा समितीच्या वतीने आयोजित या शालेय क्रीडा स्पर्धेत संजीवनी सैनिकी स्कूलच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच शिस्तबद्ध खेळ, उत्कृष्ट संघसमन्वय आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडविले. अंतिम सामन्यातही खेळाडूंनी आक्रमक व नियोजनबद्ध खेळ करत प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व राखले आणि तालुकास्तरीय विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
संजीवनी सैनिकी स्कूलमध्ये शिक्षणाबरोबरच क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुणांच्या विकासाला विशेष महत्त्व दिले जाते. नियमित सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि खेळाडूंची मेहनत यामुळे संघाने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली.
विजयी संघात रामकृष्ण प्रभात कावडे, सत्यजित अजित साईंदर, समर्थ संतोष पवार, मयंक दीपक कासे, स्पर्श निलेश शिवरकर, सिद्धांत नवनाथ सोमवंशी, आदित्य बाळू थाईल, सार्थक सागर गोरे, नमन सतीश कोरटे, राज मुकेश गेहलोत, सूर्यांश विजय गुप्ता आणि गुरु भालचंद्र डेरे यांचा समावेश आहे. संघाला पवन शिरसाठ, प्रकाश हाळणे आणि विश्वनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
संघाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संजीवनीचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे, डायरेक्टर ऑफ गव्हर्नन्स डी. एन. सांगळे, प्राचार्य के. एल. दरेकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले. आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा दिल्या.
