Uncategorized

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या ‘वाजवेल तो गाजवेल’ ढोल-ताशा स्पर्धेत तुळजा भवानी तरुण मंडळाने मारली बाजी…

मुंबादेवी तरुण मंडळाला द्वितीय व बेस्ट ड्रेपरी, हत्ती गणपती मंडळाला तृतीय पारितोषिक; क्रांती युवकने जिंकली मने सामूहिक वादनाने संपूर्ण परिसर निनादला…
कोपरगाव प्रतिनिधी:- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक ढोल-ताशा वादनाची संस्कृती जपण्याबरोबरच युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोपरगाव तहसील मैदानावर आयोजित करण्यात आलेली ‘वाजवेल तो गाजवेल’ ढोल-ताशा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आ.विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष असून, यावेळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.ढोल-ताशांच्या सामूहिक वादनाने संपूर्ण परिसर निनादून गेला. तालबद्ध वादन, शिस्तबद्ध संचलन आणि कलाकारांच्या उत्स्फूर्त सादरीकरणामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली. विविध पथकांनी दमदार वादन सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.
स्पर्धेत तुळजा भवानी तरुण मंडळाने प्रथम पारितोषिक पटकावले. मुंबादेवी तरुण मंडळाला द्वितीय पारितोषिक व बेस्ट ड्रेपरीचा पुरस्कार, तर हत्ती गणपती मंडळाला तृतीय पारितोषिक मिळाले. हत्ती गणपती मंडळाला गोवा पोलिसांकडून वादनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. क्रांती युवक संघटनेला उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला.यंदाच्या स्पर्धेचे परीक्षण महाराष्ट्रातील अनुभवी परीक्षक रासिका गुंजाळ उमरजकर, प्रसाद भगवान आणि रोहन महाजन यांनी केले. परीक्षकांनी ढोल-ताशा वादनातील ताल, लय, शिस्त, सादरीकरण आणि पथकाच्या एकत्रित वादनाच्या आधारे स्पर्धकांचे परीक्षण केले.

स्पर्धेत विविध वयोगटातील आणि वेगवेगळ्या क्षमतेच्या कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. क्रांती युवकचा बाल ताशा वादक दक्ष साबळे, हत्ती गणपतीची ध्वजधारी समृद्धी जगताप, मुंबादेवी मंडळाचा टोल वादक विवेक फंड तसेच हत्ती गणपतीचा दिव्यांग ढोल वादक हर्षदा सोनवणे यांच्या सादरीकरणाने विशेष लक्ष वेधून घेतले. जय तुळजा भवानीचे ताशा वादक भूषण सूर्यवंशी यांनीही प्रभावी वादन केले. त्यांना विशेष बक्षिसे देण्यात आली.
यावेळी बोलताना आ. विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता युवकांच्या कलागुणांना वाव देणारा आणि आपल्या समृद्ध पारंपरिक संस्कृतीचे जतन करणारा उत्सव ठरावा, हा या स्पर्धेमागील उद्देश आहे. ढोल-ताशा वादनातून युवकांची सामूहिक संघटनशक्ती, शिस्त आणि एकत्रित येण्याची भावना अधिक बळकट होते.कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे,आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी,मान्यवर यांच्यासह युवासेवक उपस्थित होते. स्पर्धेचे दर्जेदार व शिस्तबद्ध आयोजन केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी युवासेवकांचे कौतुक केले.

स्पर्धेच्या आयोजनात अध्यक्ष शुभम गायकवाड, उपाध्यक्ष पंकज कुऱ्हे, अभिषेक मंजूळ, दुर्गेश धोकडे, कार्याध्यक्ष नितीन कुऱ्हे, चेतन ईश्वरे, गोकुळ दुशिंग, सचिव कुंदन भारंबे, संजय खरोटे, श्याम शेवते तसेच प्रसिद्धी प्रमुख आकाश सुपेकर, अमित सोळसे, कृष्णा पडियार, आकाश खैरे, सौरभ होते व गौरव पानगव्हाणे यांनी योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *