
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर-
जलयुक्त शिवार उपक्रम अंतर्गत आर्ट ऑफ लिव्हिंग व मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असून या उपक्रमांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातून कोपरगाव आणि राहाता तालुक्यातील ४७ गावांची निवड झाली आहे. यामध्ये कोपरगाव तालुक्यातील २३ आणि राहाता तालुक्यातील २४ गावांचा समावेश आहे. यातील कोपरगाव तालुक्यातील १८ गावांमध्ये जलयुक्त शिवारचे काम पूर्ण झाली असून उर्वरित गावांमधील कामांनी वेग धरला असून मे अखेर सगळ्या गावातील कामे पूर्ण होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
या उपक्रमांतर्गत माहेगाव देशमुख गावातील मुख्य नाल्याचे खोलीकरण करणे आणि त्यातील साचलेला गाळ काढणे या कामाचा शुभारंभ शुक्रवार (दि.१७) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.
गाव पाणीदार करण्यासाठी आणि संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि महाराष्ट्र शासन यांच्या जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात कोपरगाव तालुक्यातील निवड झालेल्या २३ गावांमध्ये २०२३ पासून सातत्याने नाले खोलीकरणाची कामे सुरु आहे. आतापर्यंत तालुक्यातील खिर्डी गणेश, बोलकी, सडे, कोकमठाण, रवंदे, मुर्शातपूर, शिंगणापूर, सांगवी भुसार, माळेगाव थडी, ब्राम्हणगाव, टाकळी, सुरेगाव, कोळपेवाडी आणि नाटेगाव या १८ गावांमध्ये नाले खोलीकरणाची कामे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत. या गावांमध्ये नाल्यांमधील साचलेली माती, झाडे झुडपे काढल्यामुळे नाल्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढली असून नैसर्गिक पाण्याचे स्रोत मोकळे झाले आहेत. सद्यस्थितीत धारणगाव, करंजी बु, संवत्सर आणि माहेगाव देशमुख या गावांमध्ये ही कामे प्रगतीपथावर असून उर्वरित चासनळी, चांदगव्हाण, जेऊर पाटोदा, सोनारी आणि येसगाव या गावांमध्ये मे अखेरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
या योजनेमुळे अनेक बुजलेल्या नाल्यांचा आणि चरांचा श्वास मोकळा झाला आहे. अनेक ठिकाणी नाले आणि चर बुजवलेले असल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत होता. थोड्या पावसातही पाणी शेतात शिरून पिकांचे नुकसान होत होते. गेल्या वर्षी तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता नाल्यांचा श्वास मोकळा झाल्यामुळे पावसाचे अतिरिक्त पाणी शेतात साचून राहणार नाही. याच बरोबर नाले खोलीकरणामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. एकीकडे पाणीटंचाईवर मात आणि दुसरीकडे पूर परिस्थितीवर नियंत्रण अशा दुहेरी उद्देशाने राबविली जाणारी ही योजना कोपरगाव तालुक्याच्या कृषी समृद्धीसाठी अत्यंत महत्वाची ठरणारी आहे.
या नाला खोलीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी माहेगाव देशमुखचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार आशुतोष काळे यांनी या कामासाठी दाखवलेली तत्परता आणि आर्ट ऑफ लिव्हिंगने घेतलेल्या पुढाकाराने २३ गावांच्या ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
