

कोपरगाव प्रतिनिधी:-
कर्नाटक सरकार संचालित ,सर्वात जुने व मोठे समजले जाणाऱ्या श्री तारानाथ आयुर्वेद महाविद्यालय ,बेल्लारी तर्फे नुकतीच भारतातील पहिली उत्तरबस्ती वरील राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली .या कार्यशाळेसाठी प्रमुख म्हणून कोपरगाव येथील प्रसिद्ध वैद्य रामदास आव्हाड यांना निमंत्रित करण्यात आले होते .यापूर्वी भारतात विविध ठिकाणी आयुर्वेदातील विविध कर्मावर कार्यशाळा आयोजित केल्या गेल्यात व त्यात नियमानुसार अधिकतम तीस पदव्युत्तर वैद्य सहभागी झालेत .


गर्भाशयागत व मूत्रगत विकारावर स्त्री आणि पुरुष मध्ये केली जाणारी उत्तरबस्ती चिकित्सा अत्यंत फलदायी व उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे .या उत्तरबस्ती चे प्रत्यक्ष कर्म दाखविणारी कार्यशाळा भारतात आजपर्यंत कुठेही झाली नव्हती .ते धाडसी काम कोपरगाव येथील वैद्य रामदास आव्हाड यांचे अमूल्य मार्गदर्शनाखाली व त्यांचे अनुभवी प्रत्यक्ष कर्माद्वारे भारतातून आलेल्या 220 हुन अधिक पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बघता आले व शिकता आले .सर्व सर्जिकल काळजी घेत 18 उत्तरबस्ती विविध कष्टदायक आजार असलेल्या स्त्री व पुरुष रुग्णांमध्ये वैद्य रामदास आव्हाड यांनी ऑपेरेशन थिएटरमध्ये स्वतः करून दाखविले .आजपर्यंत अशा प्रकारची कार्यशाळा 220 वैद्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत भारतात कुठेही झाली नाही .त्यानंतर उत्तरबस्तीवर वैद्य आव्हाड यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले .प्रश्नोत्तरे व अन्य विद्यार्थ्यांसाठीही व्याख्यान संपन्न झाले .

त्यानंतर वैद्य रामदास आव्हाड यांचा कर्नाटक सरकार तर्फे यथोचित ट्रॅडिशनल पद्धतीने सत्कार करण्यात आला .त्यात शाल ,कर्नाटकी पगडी ,स्मृतिचिन्ह ,मानपत्र देऊन सर्व कॉलेज स्टाफ च्या वतीने प्राचार्य श्रीमती फातिमा मॅडम यांचे हस्ते मोठा सत्कार करण्यात आला .त्यावेळी पंचकर्म विभागप्रमुख डॉ राजेश सुगुर ,भारत कौंसिल सदस्य डॉ राजशेखरजी व सर्व स्टाफ उपस्थित होता .
